‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेला भारतातील इस्लाम संघटनांनी मोठा धक्का दिला आहे. ‘इसिस’ संघटनेकडून केल्या जाणाऱया अमानवी कृत्यांविरोधात फतवा काढण्यात आला असून, ‘इसिस’ ही संघटना इस्लामविरोधी असल्याची नोंद देशातील एक हजाराहून अधिक मुस्लिम धर्मगुरू आणि संघटनांनी केली आहे.

इस्लामच्या नावाखाली इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालून निष्पापांची हत्या करणे, जाळून मारणे, शीर छाटणे आणि या संहाराचे व्हिडिओ प्रसिद्ध करणे, अशी अमानवी कृत्य ‘इसिस’ करीत आहे. हे इस्लाम धर्माला मान्य नाही. त्यामुळे ‘इसिस’ ही संघटना गैर-इस्लामी असल्याचे भारतातील मौलवी आणि मुस्लिम संघटनांकडून घोषित करण्यात आले आहे. इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे अध्यक्ष डॉ.अब्दुल रहीन अंजारिया यांनी हा फतवा तयार केला असून त्यास देशातील जवळपास सर्वच मौलवी आणि मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. इतकेच नाही तर हा फतवारुपी ठराव संयुक्त राष्टसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनाही पाठविण्यात येणार आहे.

यापूर्वी सौदी अरेबियाचे मुफ्ती अब्दुल अझीझ बेन इ अब्दुल्ला यांनी इसिस संघटना इस्लाम धर्माचा शत्रू असल्याचा ठराव केला होता. मात्र, भारतातून इतक्या मोठ्या संख्येने इस्लाम धर्मगुरू आणि संघटनांनी एकत्र येऊन इसिस विरोधात फतवा जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.