लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर आतापर्यंत जातीय हिंसाचाराच्या १२ हून अधिक घटना घडल्या आहेत आणि जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यासारखे फुटीर प्रश्न एनडीए सरकारने उपस्थित केले, असे माकपने सोमवारी म्हटले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांध्ये झालेली वाढ या प्रश्नांवर उपाययोजना आखल्या जाव्या, अशी जनतेची अपेक्षा आहे. मात्र भाजपप्रणीत सरकारला फुटीरतावादी प्रश्नच उपस्थित करण्यात रस आहे असे वाटते, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याबाबत एका मंत्र्यानेच भाष्य केल्याने तेथील जनतेला अधिकच परकेपणाचे वाटेल. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर देशात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी जातीय हिंसाचाराच्या १२ हून अधिक घटना घडल्या आहेत, असेही करात म्हणाले.

पुण्यातील हत्या विजयोन्माद
पुण्यात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयटी क्षेत्रातील मुस्लीम तरुणाची हत्या केली हे विजयोन्मादाचे द्योतक आहे. त्यामुळे अल्पसंख्य समुदायाच्या बचावासाठी माकप काम करील, असेही ते म्हणाले. पराभवाची जबाबदारी पक्षनेतृत्वाचीच आहे आणि ती आम्ही स्वीकारत आहोत, असेही ते म्हणाले.

Story img Loader