नेपाळमधील भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या रविवारी ७ हजार ०४० पर्यंत पोहोचली असून जखमींची संख्या १४ हजार १२३ झाली  आहे. आणखी मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडत आहेत. दरम्यान या भूकंपात दीड लाखावर घरे जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या या भूकंपात नेपाळमध्ये ५४ परदेशी व्यक्ती ठार झाल्या. त्यात ३८ भारतीयांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या या ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने एव्हरेस्ट शिखरही हादरले होते. जखमी परदेशी व्यक्तींमध्ये ४८ जण असून त्यात १० भारतीयांचा समावेश आहे, तर ८२ परदेशी नागरिक बेपत्ता आहेत.
सायली नावाच्या गावात दोन पुरुष व एक महिला अशा तिघांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान एव्हरेस्टवरील मकालू बेस कँपवर १२ जणांना वाचवण्यात आले असून त्यात एका भारतीय गिर्यारोहकाचा समावेश आहे.
नेपाळच्या दूरस्थ पर्वतीय भागात मोठे नुकसान झाले असून मदतकार्य संथ गतीने सुरू आहे, त्यातच भूकंपाचे आणखी धक्के बसून लोकांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी मदत कार्यात वेगाची अपेक्षा व्यक्त केली आहे. सिंधुपालचौक या एका शहरात ४० हजार घरे कोसळली असल्याचे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संस्थेने म्हटले आहे.
दीड लाखांवर घरे जमीनदोस्त
नेपाळमधील भूकंपात १ लाख ६० हजार ७८६ घरे जमीनदोस्त झाली आहेत. १९३४ च्या भूकंपात जेवढी घरे जमीनदोस्त झाली होती त्याच्या ही संख्या दुप्पट आहे. गोरखा व सिंधुपालचौक  भागात ९० टक्के घरे कोसळली, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवता मदत संस्थेने सांगितले आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार १ मे अखेर १ लाख ६० हजार ७८६ घरे कोसळली, तर १ लाख ४३ हजार ६४२ घरांचे नुकसान झाले आहे, असे असले तरी एकूण पाच लाख घरे कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नेपाळमध्ये २५ एप्रिलला ७.९ रिश्टरचा जो भूकंप झाला होता. सिंधुपालचौक येथे सर्वाधिक म्हणजे दोन हजार लोक मरण पावले आहेत. गोरखा येथे शेकडो लोक ठार झाले आहेत.
 नेपाळला पुन्हा उभे करण्यास अंदाजे ४१५ दशलक्ष डॉलर्सची मदत लागेल. ८१ वर्षांंपूर्वीच्या भूकंपात ८० हजार ८९३ घरे कोसळली होती. नेपाळ-बिहार सीमेवर १९३४ मध्ये  झालेल्या या भूकंपाचे केंद्र माउंट एव्हरेस्टपासून दक्षिणेला साडेनऊ कि.मी. अंतरावर होते. त्यावेळी घंटाघर (घडय़ाळ मनोरा) कोसळला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा