पीटीआय, गंगटोक
उत्तर सिक्कीमच्या लाचेन आणि लाचुग भागांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्ता बंद झाल्याने ६० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह २४०० हून अधिक पर्यटक अडकून पडले आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. अडकलेल्या २,४६४ पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १९ बस आणि ७० छोटी वाहने तैनात केली आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की आतापर्यंत तीन बस आणि दोन अन्य वाहनांद्वारे १२३ पर्यटकांना सिक्कीमची राजधानी गंगटोककडे रवाना करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रतिसाद दल, सिक्कीम पोलीस, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, लष्कर, पर्यटक कंपन्यांची संघटना आणि अन्य यंत्रणाच्या कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, चुंगथांगकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी बंद झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू होईल. उत्तर सिक्कीम जिल्हा प्रशासनाने अडकलेल्या प्रवाशांची माहिती मिळवण्यास मदत व्हावी यासाठी दूरध्वनी क्रमांक सुरू केले आहेत.