Israel – Hamas News in Marathi : इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा आज २८ वा दिवस. जवळपास महिन्याभरापासून गाझा पट्टीवर नरसंहार चालू आहे. इस्रायलने शनिवारी रात्रीही गाझा पट्टीवर हवाई हल्ला चढवला. सेंट्रल गाझामधील माघाझी निर्वासित छावणीमध्ये इस्रायलने हवाई हल्ला केल्याने जवळपास ५१ पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने शनिवारी रात्री संपूर्ण गाझावर बॉम्बफेक चालूच ठेवली आणि गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात हल्ले तीव्र केले. या हल्ल्यांमध्ये अनेक निवासी घरेही उद्ध्वस्त झाली. इस्रायलच्या भूदलानेही गाझामधील हमासला लक्ष्य करून हल्ले चालूच ठेवले आहेत.

हेही वाचा >> आधी ओलिसांची सुटका, मगच युद्धविराम; अमेरिकेच्या दबावानंतरही इस्रायल भूमिकेवर ठाम

गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात किमान २३१ लोक मारले गेले आहेत. यामुळे युद्धातील एकूण मृतांची संख्या ९ हजार ४८८ झाली आहे. मृतांमध्ये ३ हजार ९०० मुले असून १५०९ महिलांचा समावेश आहे. गाझा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २४ हजारांहून हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर वेस्ट बँक प्रदेशात इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात किमान १४० जण ठार झाले आहेत.

हमासच्या नेतृत्त्वापर्यंत पोहोचू

“७ ऑक्टोबरच्या हल्ल्यासाठी हमास जबाबदार आहे. त्यामुळे हमासच्या नेतृत्वापर्यंत आम्ही पोहोचू. आम्ही हमास गाझा प्रमुख याह्या सिनवारपर्यंत पोहोचून त्याला संपवू”, असं इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी म्हटलं आहे.

६० हून अधिक ओलीस बेपत्ता

गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे ६० हून अधिक ओलीस बेपत्ता असल्याची माहिती हमासने दिली आहे. तर, याबाबत इझ अल-दीन अल-कासम ब्रिगेड्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, गाझा विरुद्धच्या सततच्या क्रूर आक्रमणामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत (ओलिसांपर्यंत) कधीही पोहोचू शकणार नाही.”

…तर युद्धविराम अशक्य

सुमारे महिनाभर सुरू असलेल्या युद्धात नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि गाझामध्ये आणखी मदतसामग्री येऊ देण्यासाठी ‘मानवीय युद्धविराम’ करण्याकरता अमेरिकेचा वाढत असलेला दबाव इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी  मान्य केलेला नाही. हमासने ओलीस ठेवलेल्या सुमारे २४० लोकांची सुटका केल्याशिवाय तात्पुरता युद्धविराम होणार नाही, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 50 killed in israeli bombing of gazas regufee camp as assault continues sgk