कंबोडिया देशात भारतीयांकडून बळजबरीने साबयर गुन्हे करून घेतले जात असल्याच्या १३० तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सरकारने भारतीय नागरिकांना सोडविण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानंतर कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह शहरातील भारतीय दूतावासाने ७५ भारतीयांची सुटका केली आहे. दूतावासाचे द्वितीय सचिव अवरान अब्राहम यांनी ही माहिती दिली.
कंबोडियात जवळपास ५००० भारतीय नागरिकांकडून बळजबरीने सायबर गुन्हे करवून घेतले जात आहेत, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिली होती. सरकारच्या अंदाजानुसार, मागील सहा महिन्यात या सायबर गुन्हेगारीतून सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंबोडियामध्ये अडकलेले नागरिकांकडून भारतीय लोकांनाच लुटण्याचे काम केले जाते. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम या लोकांकडून करून घेतले जाते.
या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर सुरक्षा तज्ज्ञांची बैठक बोलावून कंबोडियामध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी धोरण निश्चित केले होते.
अब्राहम यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, कंबोडियाच्या विविध भागातून दररोज चार ते पाच तक्रारी फोनद्वारे येत आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना याची माहिती देतो. तसेच या लोकांनी दूतावासापर्यंत कसे पोहोचावे, याचे मार्गदर्शन करत आहोत. अनेक लोक मानसिक धक्क्यात असल्यामुळे त्यांना समुपदेशन देण्याचेही काम आम्ही करत आहोत. अब्राहम पुढे म्हणाले की, जेव्हा कंबोडियात अडकलेल्या लोकांची सुटका केली जाते, तेव्हा ते भारतात जाऊन एफआयआर दाखल करत नाहीत, ही एक मोठी अडचण आहे. जर त्यांनी एफआयआर दाखल केले तर भारतीय पोलीस एजंट आणि कंपन्यांपर्यंत पोहोचू शकतात.
आम्ही केंद्रीय गृहखात्याच्या संपर्कात आहोत. आम्हाला जेव्हा जेव्हा एखाद्या एजंटची माहिती मिळते, तेव्हा आम्ही ती भारताला देतो. जर सुटका झालेल्या लोकांनी एफआयआर दाखल करण्यास सुरुवात केली, तरच पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकतील, असेही अब्राहम म्हणाले.
भारतीय नागरिक कंबोडियात कसे अडकले?
भारतीय नागरिक कंबोडियाच्या सायबर गुन्हेगारीच्या चक्रात कसे फसतात, याबद्दल माहिती दिली आहे. कंबोडियात डेटा एंट्रीची नोकरी आहे, असे समजून अनेक लोक इथे येतात. पण एजंटकडून त्यांची दिशाभूल झाल्याचे समजल्यानंतर आपण इथे येऊन एका जाळ्यात अडकलो असल्याचे लक्षात येते. तरीही अनेकजण या जाळ्यातून तात्काळ बाहेर पडू शकत नाहीत. बहुतेक लोक गरीब पार्श्वभूमीतून आलेले असतात. त्यांच्यापैकी काहींनी एजंटना नोकरीसाठी मोठी रक्कम दिलेली असते. ही रक्कम इथे राहून ते कशीतरी वसूल करतील आणि नंतर बाहेर पडतील, असा विचार अेक लोक करतात.