दक्षिण आफ्रिकेतील शाळकरी मुलींपैकी २८ टक्के मुली या एचआयव्हीग्रस्त आहेत. २०११ मध्ये ९४ हजार मुली गर्भवती झाल्या होत्या आणि त्यातील काहीजणी तर अवघ्या दहा वर्षांच्या होत्या, अशी आकडेवारी दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री आरोन मोत्सोआलेडी यांनी गुरुवारी जाहीर केली. या भीषण वास्तवाने माझे हृदय विदीर्ण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वत: डॉक्टर असलेले आरोन यांनी ही आकडेवारी म्हणजे भविष्य किती दाहक आहे याचीच इशाराघंटा असल्याचे नमूद केले. शाळकरी मुलींमध्ये एचआयव्हीची लागण २८ टक्के मुलींनाच झाली असली तरी एचआयव्हीग्रस्त मुलांचे प्रमाण अवघे चार टक्केच आहे. त्यामुळे या मुलींचा शरीरसंबंध प्रौढ व्यक्तिंशीच येत आहे, ही देखील लैंगिक शोषणावर प्रकाश टाकणारी धक्कादायक बाब आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हे चित्र बदललेच पाहिजे. त्यासाठी धडक मोहीम हाती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जगात सर्वाधिक एचआयव्हीग्रस्त असलेला देश दक्षिण आफ्रिका हाच असून आकडेवारीनुसार पाच कोटी लोकसंख्येच्या या देशात तब्बल ६० लाख नागरिक एचआयव्हीग्रस्त आहेत.
एचआयव्हीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असली तरी लहान मुलींमध्ये एचआयव्हीचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. यावर मात करण्यासाठी शाळांमध्ये मोफत तपासणी आणि कंडोम वाटप हे उपाय अमलात येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा