लोकसभेत वक्फ बोर्ड विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यसभेत चर्चा सुरु आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी दुपारी १ वाजता हे विधेयक राज्यसभेतच्या पटलावर ठेवलं. यावेळी सुरु झालेल्या चर्चेदरम्यान भाजपाचे खासदार राधामोहन अग्रवाल यांनी असदुद्दीन ओवैसींवर जोरदार टीका केली. तसंच वक्फ विधेयकावरुन विरोधक संभ्रम पसरवत आहेत अशीही टीका त्यांनी केली.

काय म्हणाले राधामोहन अग्रवाल?

चित्रपटांमध्ये आपण जसे गुंड पाहतो ना? एखाद्या स्त्रीवर हात ठेवतात ती त्यांची होते असं दाखवलं जातं. अगदी त्याच प्रकारे या वक्फ बोर्डांनी भू माफियांसाठी काम केलं आहे. ज्या जमिनीवर हात ठेवला ती जमीन यांची झाली. मी तुम्हाला सगळं सांगू शकतो की यांनी लूट कशी केली आहे. सय्यद नासीर हुसैन हे राज्यसभेचे खासदार झाले. मी त्यावेळी कर्नाटकमधल्या बंगळुरुत होतो. त्यावेळी विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा झाल्या होत्या. भाजपाने याला विरोध दर्शवला तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात धाडण्यात आलं.

हिंदू समाजात कायमच परिवर्तन करत असतो-अग्रवाल

आजचा दिवस गरीब मुस्लिमांसाठी आणि विधवा मुस्लिम भगिनींसाठी ऐतिहासिक दिवस आहे. वक्फ सुधारणा विधेयकात आज क्रांतिकारी परिवर्तन होणार आहे. आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही सातत्याने आमच्या समाजात परिवर्तन करतो. आम्ही कायमच समाजातील दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष केला आहे. आमच्या धर्मात सती प्रथा होती ती बंद करण्यासाठी आम्ही कायदा आणला याची साक्ष इतिहासात आहे. एवढंच नाही तर आम्ही बालविवाहाच्या विरोधात कायदा आणला. मला आश्चर्य वाटतं की ७५ वर्षांत मुस्लिम समाजासाठी अशा प्रकारच्या सुधारणा का झाल्या नाहीत? गरीब मुस्लिमांचं आयुष्य सुधरावं यासाठी कुठल्याही सुधारणा आणणं सोडा सुचवल्याही गेल्या नाहीत.

ओवैसींनी माझं नाव मौलाना राधा मोहन अग्रवाल ठेवलंय-अग्रवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका बैठकीत सगळ्या खासदारांना हे बजावून सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा हिंदू-मुस्लिम कधीही करु नका. विकसाची गंगा प्रत्येकाच्या दारात जाईल याची काळजी घ्या. या लोकांनी काय केलंय माहीत आहे का? ती जागा आहे बघा जिथे ओवैसी बसतात. त्यांनी माझं नाव मौलाना राधा मोहन अग्रवाल असं ठेवलं आहे. मला सांगा यापेक्षा माझा मोठा सन्मान काय असेल? हजरत मोहम्मद यांनी त्यांच्या आयतांमध्ये लिहिलं आहे की एक पैसा ही कुणाला दिला तर ते लिहून ठेवा. त्यासाठी साक्षीदार ठेवा, तुम्हाला त्यावरुन कुणी आव्हान देता कामा नये. तुम्ही सांगता तुमच्याकडे इतकी सगळी संपत्ती आहे, पण मग त्याचे रेकॉर्ड त्याचे तपशील कुठे आहेत? असाही सवाल अग्रवाल यांनी केला.