असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारांचा शपथविधी होत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. त्यामुळे त्यांच्याविरोधात लोकसभेत गदारोळ झालेला पाहण्यास मिळाला होता. आता पुन्हा एकदा असदुद्दीन ओवैसींनी भाजपावर निशणा साधला आहे, तसंच संसदेत संविधानाचं पान दाखवत भाजपाने तिरस्कार पसरवल्याचा आरोप केला आहे. ज्या संविधानावर टिपू सुलतानचा फोटो होता त्यावर सरदार वल्लभभाई पटेल आणि श्यामाप्रसाद मुखर्जींची सही होती असा दावा असदुद्दीन ओवैसींनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले ओवैसी?

“अध्यक्ष महोदय, अभिभाषणावर मला संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी आज त्या लोकांच्या वतीने बोलतो आहे जे दिसतात, त्यांची चर्चा होते पण त्यांचं ऐकून कुणीही घेत नाही. मी त्यांच्या वतीने बोलतो आहे ज्यांना पंतप्रधान घुसखोर म्हणतात. मी त्या आया बहिणींच्या वतीने बोलतो आहे ज्यांच्याबाबत मोदी म्हणतात की यांना जास्त मुलं होतात. मी मॉब लिंचिंग द्वारे ज्यांना मारलं जातं त्यांची बाजू मांडायला उभा आहे. मी त्या मूक आई वडिलांच्या वतीने बोलतो आहे ज्यांची मुलं या सरकारमुळे तुरुंगात आहेत.” असं ओवैसी म्हणाले.

हे पण वाचा- ओवैसींची आगपाखड, “भ्याड सावरकरांसारखं वागू नका, घराला काळं फासून पळून..”

संविधान दाखवण्यासाठीची किंवा चुंबन घेण्यासाठीची गोष्ट नाही

“संविधान तयार होत असताना तेव्हा आरक्षणाचा विषय आला. त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांनी हा निर्णय घेतला की यावर आपण एक होणार नाही. आपल्या वरिष्ठांनी काय म्हटलं? बहुसंख्यांनी अल्पसंख्याकाचं रक्षण करणं हे कर्तव्य आहे हे घटना लिहिणाऱ्यांनी ठरवलं. भाजपा मुस्लिम लोकांच्या तिरस्कारावर निवडून येते. जे मुस्लिमांची बाजू घेतता ते देखील तसं फक्त दाखवतात. फक्त चार टक्के मुस्लिम निवडून येतात. संविधान हे काही पुस्तक नाही ज्याचं चुंबन घेतलं जावं, जे दाखवलं जावं. संविधान एक प्रतीक आहे. संविधान हे आपल्या वरिष्ठांनी, आपल्या देशाच्या संस्थापकांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे देश चालवण्यासाठी सर्वधर्मांची सहमती आवश्यक असल्याचं आपल्या देशाच्या संस्थापकांनी म्हटलं. पण चार टक्के लोक निवडून येतात. जे मोहब्बतचे दावे करतात त्यांनी पंडीत नेहरु, सरदार पटेल यांनी अल्पसंख्याकांबाबत काय म्हटलं होतं ते वाचावं” असा टोला ओवैसींनी राहुल गांधींनाही लगावला. “भाजपाला आमचं अस्तित्वच नकोय आणि जे आमची बाजू घेतात त्यांच्यासाठी आमचं महत्त्व फक्त मत देण्यापुरतं आहे.”

CSDS चा डेटा काय सांगतो याचाही ओवैसींच्या भाषणात उल्लेख

“ओबीसी समाजाचे खासदार हे आत्ता उच्चवर्गीय खासदारांच्या दर्जाचे झाले आहेत. मात्र मुस्लिम समुदायाकडे दुर्लक्ष होतं आहे. CSDS चा डेटा हे सांगतो की मुस्लिमांची व्होट बँक या देशात नाही. ४ जूननंतर आत्तापर्यंत सहा मुस्लिमांचं मॉब लिंचिंग झालं. ११ घरं बुलडोझरने पाडण्यात आली. हिमाचलमध्ये एका मुस्लिम माणसाचं दुकान उडवलं. आता कदाचित वेळ आली आहे मुस्लिम नाव उच्चारण्यावरही बंदी घातली जाईल. माझं भाषण ऐकून ज्या मंत्र्यांना पोटदुखी झाली ते पाहून मला बरं वाटलं असं म्हणत त्यांनी मनसुख मांडवीय यांनाही टोला लगावला. आता नरेंद्र मोदींना जे जनमत मिळालं आहे ते फक्त आणि फक्त मुस्लिम तिरस्कार आणि हिंदुत्वाचे गोडवे गायल्याने मिळालं आहे. मी हे सांगू शकतो मुस्लिम समुदायाने मोदींना नाकारण्यासाठी मतदान केलं आहे. मी विरोधी पक्षांनाही हे सांगू इच्छितो की हा तुमचा विजय नाही आम्ही समूहाने बाहेर येऊन मतदान केलं आहे. तुम्ही सगळ्यांनीही या गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आम्ही फक्त मतं देण्यासाठी आहोत का? हा प्रश्न जरा त्यांनी स्वतःला विचारावा.” असंही ओवैसी म्हणाले.

आज भारताचे अर्धे तरुण बेरोजगार आहेत आणि…

“आज भारताचे अर्धे तरुण बेरोजगार आहेत. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ७५ लाख तरुणांचं भवितव्य धुळीला मिळालं कारण पेपर लिक प्रकरणं घडली. इस्रायलला भारत हत्यारं का पुरवतो आहे? मोदी सरकार अल्पसंख्याकांचं बजेट का कमी करतं? पनू केसमध्ये निखिल गुप्ताचा हात आहे. त्याला पनूला मारण्यासाठीचा आदेश कुणी दिला होता? त्याच्यावर पीएमएलए का लावला गेला नाही?” असे प्रश्नही असदुद्दीन ओवैसींनी विचारले आहेत.

संविधानावर टिपू सुलतानचा फोटो

आज मी तुम्हाला सांगू इच्छितो संविधानावर टिपू सुलतानचा फोटो होता, त्यावर वल्लभभाई पटेलांची सहीही आहे, श्यामाप्रसाद मुखर्जींनी सही केली. तुम्ही त्या टिपू सुलतान यांना नाकारणार आहात का? जे तुम्ही करत आहात तो तुमचा तिरस्कार आहे. मी त्यासाठी एक शेरच इथे म्हणतो, “क्या दिन दिखा रहीं है सियासत की धूप छांव, जो कल सपूत थे वो कपूतोमें आ गये, थे अस इस कदर अजीन के पैरोमें ताज थे इतने हुए जलील की जुतो में आ गये.” हा शेर म्हणत त्यांनी आपलं भाषण संपवलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owaisi sensational claim tipu sultan photo on constitution vallabhbhai patel signature bjp spread hatred said this in loksabha speech scj