कानपूरमध्ये अटक करण्यात आलेला अत्तर व्यापारी पियूष जैनने जीएसटी इंटेलिजन्स काऊन्सीलच्या निर्देशकांकडे म्हणजेच डीजीजीआयकडे छापेमारीमध्ये जप्त करण्यात आलेले पैसे परत करण्याची मागणी केलीय. कर आणि दंडाची रक्कम वजा करुन आपले पैसे आपल्याला परत देण्यात यावेत अशी मागणी जैन याने केलीय. जैन याला पोलिसांनी करचोरी प्रकरणात अटक केली असून सध्या त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

पियूष जैनच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये २५७ कोटींची रोख रक्कम, २३ किलो सोनं आणि इतरही बरीच संपत्ती सापडली आहे. हे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्येही चांगलेच चर्चेत असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असणाऱ्या समाजवादीकडून या प्रकरणावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दुसरीकडे जैन याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी डीजीजीआयची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अम्रिश तंडन यांनी न्यायलयाला दिलेल्या माहितीनुसार, जैनने करचोरी केल्याचा खुलासा केलाय. त्याने करचोरी आणि दंडाची रक्कम अशा एकूण ५२ कोटींच्या गैरव्यवहाराची कबुली दिल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

त्याचवेळी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना पियूष जैनच्या वकिलांनी दंड आणि करचोरी प्रकरणातील कराची अशी एकूण ५२ कोटींची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम पियूष जैन यांना परत करण्याचे निर्देश डीजीजीआयला देण्यात यावेत अशी मागणी केली. यावर उत्तर उत्तर देताना तंडन यांनी जप्त करण्यात आलेली रक्कम ही करचोरी प्रकरणातील असल्याने ती परत दिली जाणार नाही. तसेच जैन यांना अतिरिक्त ५२ कोटींचा दंड आणि करचोरीची रक्कम जमा करायची असल्यास डीजीजीआय ती स्वीकारेल, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.

नक्की वाचा >> पियूष जैनच्या घरावरील आयकर विभागाच्या छापेमारीवर आधारित चित्रपटाची घोषणा; नाव असणार…

जैनच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेली रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यात आलीय. ही रक्कम आता भारत सरकारच्या ताब्यात जाईल असं तंडन यांनी स्पष्ट केलंय. जैनच्या घरामध्ये सापडलेली रोख रक्कम एवढ्या मोठ्याप्रमाणात होती डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांना पैसे मोजण्याचे मशीन हे एसबीआयकडून घ्यावे लागले होते.

आयकर आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमा शुल्क बोर्डाने मागील काही दिवसांमध्ये केलेल्या छापेमारीमधे पियूष जैनच्या घरामध्ये २५७ कोटींची रोख रक्कम सापडली असून एकूण १६ संपत्तींसंदर्भातील माहिती मिळाली आहे. कारवाईदरम्यान काही कागदपत्रं सापडली असून यानुसार पियूष जैन यांच्याकडे १६ महागड्या संपत्ती आहे. यामधील ४ कानपूर, ७ कनौज, २ मुंबई आणि १ दिल्लीत आहे. विशेष म्हणजे दोन संपत्ती दुबईत असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर २३ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि बिस्कीटंही सापडलीय. घरात सापडलेल्या सोनं हे परदेशातून आणल्याच्या त्यावर चिन्हांकित करण्यात आल्याने आता हे सोनं तस्करी करुन आणलं का याचा तपास महसूल गुप्तचर संचालनालयाकडे म्हणजेच डीआरआय करत आहे.

Story img Loader