करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, चौथ्या लाटेचा सामना करणाऱ्या राजधानी दिल्लीतील आरोग्य व्यवस्था कधी इतकी कोलमडली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालये हतबल झाली असून, ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला विनवण्या करून थकल्यानंतर अनेक रुग्णालयांनी उच्च दरवाजे ठोठावले आहेत. या याचिकांवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या संतापाचा कडेलोट झाला. रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अडथळा आणणाऱ्यांना अधिकाऱ्यांना संबंधितांना पाठिशी घालणार नाही, असं सांगत न्यायालयाने सज्जड दम भरला.

दिल्लीतील महाराजा अग्रसेन हॉस्पिटल, जयपूर गोल्डन हॉस्पिटल, बात्रा हॉस्पिटल आणि सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या या रुग्णालयांना सातत्याने ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विपीन संघी आणि रेखा पल्ली यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. खंठपीठासमोर झालेल्या विशेष सुनावणीत न्यायालयाने दिल्लीतील विविध रुग्णालयात जाणवत असलेल्या तुटवड्यावरून संताप व्यक्त केला. या महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी आहे. ज्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, शेवटी त्यांचा मृत्यू होईलच. पण, समस्या ही आहे की, ज्यांचे प्राण वाचवणं शक्य आहे ते लोकही मरण पावत आहे. मृत्यूदर कमी करण्याची गरज आहे, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं.

आणखी वाचा- अरेरे! नाशिक दुर्घटनेची दिल्लीत पुनरावृत्ती; २५ रुग्णांचा करुण अंत

आपण याला दुसरी लाट म्हणत आहोत, पण खरंतर ही त्सुनामी आहे, असं सांगत न्यायालयाने केंद्र सरकारला तयारीविषयी विचारणा केली. मे मध्यावतीपर्यंत करोना रुग्णसंख्या शिखर गाठणार असून, केंद्र सरकारने मुलभूत आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स, वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर, नर्स यांच्यासह इतर), लस आणि ऑक्सिजन यांची काय तयारी आहे, अशी विचारणाही न्यायालयाने केंद्राला केली आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या मुद्द्यावरून न्यायालयाच्या संतापाचा कडेलोट झाला. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या केंद्र, राज्य वा स्थानिक प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचं नाव दिल्ली सरकारने सांगावं. आपण कोणालाही पाठिशी घालणार नाही. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्यांना फासावर लटकवू, असा सज्जड दम दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी दिला.

आणखी वाचा- मृत्यूचं थैमान थांबेना! २४ तासांत २,६२४ जणांनी करोनामुळे गमावले प्राण

रुग्णांचे जीव वाचवताना रुग्णालये रडकुंडीला…

दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांबरोबरच रुग्णालयांचे प्रचंड हाल सुरू आहेत. उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या जयपूर गोल्डन रुग्णालया शनिवारी रात्री २५ रुग्णांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला. यातील बात्रा रुग्णालयातही ३६० रुग्णांचे प्राण धोक्यात आले होते. केवळ २५ मिनिटं पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक राहिला होता. वेळीच ऑक्सिजनचं टँकर आल्याने रुग्णालयाने सुटकेचा निःश्वास टाकला. तर महाराजा अग्रसेन रुग्णालयाचीतही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचवताना रुग्णालये रडकुंडीला येऊ लागली आहेत.

Story img Loader