OYO New Rules for Unmarried Couples: भारतातील शहरात चांगले आणि किमान दर्जा असणारे हॉटेल शोधण्यासाठी ‘ओयो’ चांगलेच लोकप्रिय आहे. मात्र आता ‘ओयो’ने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. यापुढे अविवाहित जोडप्यांना ‘ओयो’ हॉटेलमध्ये थेट एंट्री दिली जाणार नाही. आतापर्यंत प्रेमीयुगुलांना ‘ओयो’मध्ये पटकन रुम बुक करता येत होती. मात्र आता यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदा लागू करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटिआयने सदर वृत्त दिले आहे. ज्यात म्हटले आहे की, ‘ओयो’ने अविवाहित जोडप्यांना सरसकट एंट्री देण्यावर बंदी आणली आहे. जर यापुढे जोडप्यांना ‘ओयो’मध्ये रुम बुक करायची असेल तर त्यांना त्यांच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. हा नियम ऑनलाईन बुकिंगसाठीही लागू करण्यात आला आहे. ही नियमावली तात्काळ लागू करावी, असे निर्देश ‘ओयो’ने मेरठमधील संलग्न हॉटेल्सना दिले आहेत.

हे वाचा >> OYO चा फूल फॉर्म माहितीये का? ओयोची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या

कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, सदर बदल केल्यानंतर मेरठचा अनुभव घेऊन इतर शहरातही अशाच प्रकारचे बदल केले जाणार आहेत. मेरठसह इतर काही शहरांमधून नागरिकांकडून ‘ओयो’कडे याबाबत वारंवार विचारणा होत होती. ‘ओयो’ हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना रुम बुक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशा मागण्या इतर शहरांमधून समोर आलेल्या आहेत, अशी माहिती ओयोने दिली.

‘ओयो’ कंपनीने काय म्हटले?

ओयोचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की, सुरक्षित आणि जबाबदार अशी आदरातिथ्याची सेवा देण्यासाठी ओयो कटिबद्ध आहे. आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो. पण ज्या प्रदेशात आमचा व्यवसाय सुरू आहे, तेथील कायदा आणि नागरी संघटनांना सहकार्य करणे, हीदेखील आमची जबाबदारी आहे. या बदलानंतर आम्ही वेळोवेळी या धोरणाचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेत राहू.

हे ही वाचा >> पैशांसाठी सीमकार्ड विक्री ते १६००० कोटींची संपत्ती, वाचा OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या यशाची भन्नाट कहाणी!

धारणा बदलण्याची योजना

ओयोबद्दलची धारणा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. या माध्यमातून ओयो हॉटेल्स कुटुंब, विद्यार्थी, व्यावसायिक प्रवासी, धार्मिक यात्रेकरू आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचे ठसविण्यासाठी हे नवे बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलाच्या माध्यमातून ग्राहकांनी ओयोमध्ये अधिक दिवस राहावे आणि पुन्हा पुन्हा बुकिंग करावे, असा प्रयत्न केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oyo changes check in rules no entry for unmarried couples know revised guidelines kvg