काळ्या पैशांच्या मुद्दयावरून उपोषणास बसणाऱ्या बाबा रामदेव यांची उचलबांगडी करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता परदेशी बँकांमधील काळा पैसा परत आणण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. भारताने स्वित्र्झलड सरकारला लिहिलेल्या पत्राचे उत्तर आले असून; त्यासंबंधी भारत लवकरच पुढाकार घेईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शनिवारी दिली. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्विस बँकांमध्ये भारतीयांनी अवैध मार्गाने जमविलेला पैसा ठेवला असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर भारताने स्वित्र्झलडला पत्र लिहिले होते.
काही विशिष्ट व्यक्तींच्या बँक खात्यांची माहिती भारताने मागवली आहे. ही माहिती देण्यासंबंधी स्विस व भारत सरकारमध्ये बोलणी सुरू आहे. स्विस सरकारने लिहिलेल्या पत्रात स्वत:ची बाजू मांडली आहे.
पत्राचा विस्तृत तपशील सांगण्यास अप्रत्यक्षपणे नकार देत चिदम्बरम म्हणाले की, स्विस सरकारच्या लांबलचक पत्राचा बारकाईने अभ्यास करण्यात येत आहे. २००९ साली झालेल्या जी-२० परिषदेच्या ठरावाची आठवण चिदम्बरम यांनी करून दिली. या परिषदेत बँक खात्यांची माहिती गुप्त न राखण्यावर खल झाला होता. त्यामुळे स्विस सरकारचे काहीही म्हणणे असले तरी भारताची कठोर भूमिका आहे. वेळ पडली तर स्वित्र्झलडविरोधात भारत असहकाराचे धोरण स्वीकारेल, असे स्पष्ट संकेत चिदम्बरम यांनी दिले.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या विकासाची महती सांगून मतांचा जोगवा मागत आहेत. प्रत्यक्षात गुजरातचा विकास सर्वसाधारण असाच आहे. गुजरात ना कधी अत्यंत विकसित वा अत्यंत मागास राज्य होते. त्यामुळे सर्वसाधारण विकासाची कथा रंगवून सांगण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न अत्यंत केविलवाणा असल्याची टीका चिदम्बरम यांनी केली. गुजरात म्हणजे विकासाचा आदर्श, हा अपप्रचार आहे. मानवी विकास निर्देशांक, साक्षरता आदींमध्ये गुजरात पिछाडीवर असल्याचा दावा चिदम्बरम यांनी केला.
गेली दहा वर्षे सत्तेत प्रादेशिक पक्षांच्या जीवावर सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पूर्वाश्रमीच्या सहकारी पक्षांविरोधात जणू काही आघाडीच उघडली आहे. चीट फंडप्रकरणी चौकशीच्या नावाखाली काँग्रेस तपास यंत्रणांचा वापर तृणमूल काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी करीत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याचे जोरदार खंडन चिदम्बरम यांनी केले. चीट फंड प्रकरणात चिदम्बरम यांच्या पत्नींचीदेखील गुंतवणूक असल्याचे सांगून चौकशीदरम्यान सत्य बाहेर येईल, असा दावा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केला होता. यासंबंधी छेडले असता चिदम्बरम यांनी उत्तर देण्याचे टाळले. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणात द्रमुक नेत्यांविरोधात सुरू झालेल्या चौकशीवर बोलण्यास चिदम्बरम यांनी नकार दिला. ही एक नियमित प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले.
काळा पैसा मायदेशी आणण्यासाठी चर्चा सुरू
काळ्या पैशांच्या मुद्दयावरून उपोषणास बसणाऱ्या बाबा रामदेव यांची उचलबांगडी करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता परदेशी बँकांमधील काळा पैसा परत आणण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
First published on: 27-04-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidamabaram india switzerland looking at ways to share information on black money