पाच राज्यांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. तर काही नेत्यांनी पराभवानंतर पक्षाला घरचा आहेर दिला आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिंदरबरम यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
एनडीटीव्हीशी बोलताना चिदंबरम म्हणाले की, “मी उत्तर प्रदेशच्या पक्ष नेतृत्वाला एकाच वेळी निवडणूक लढविण्यापासून आणि पक्षाची पुनर्बांधणी करण्यापासून सावध केले होते. आधी पक्षाची पुनर्बांधणी करा, नंतर निवडणूक लढवण्याबद्दल विचार करा, अशी सूचना केली होती. प्रियंका गांधी यांच्यावर चार वर्षांपूर्वी त्यांचे भाऊ आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी सोपवली होती. परंतु निवडणूक प्रचारादरम्यान या दोन्ही गोष्टी करण्याबाबत त्या उघडपणे बोलत होत्या,” असं चिदंबरम यांनी सांगितलं. या निवडणुकीत झालेल्या पराभवाला केवळ गांधी कुटुंबाला जबाबदार धरणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.
“पक्षात काही गंभीर कमतरता आहेत, ज्या मी, कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणल्या आहेत. या पाच राज्यांत झालेल्या पराभवानंतर सर्वात आधी आम्हाला त्या संघटनात्मक कमकुवतपणा दूर करावा लागेल,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ते म्हणाले की, “यूपीच्या प्रभारी लोकांनी एकाच वेळी पक्षाची पुनर्बांधणी करणे आणि निवडणूक लढवणे, या दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना इशारा दिला होता की, दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाहीत. पक्षाची पुनर्बांधणी आधी झाली पाहिजे आणि नंतर निवडणूक लढवता येऊ शकते, पण दुर्दैवाने पक्षाची पुनर्बांधणी आणि निवडणूक एकाच वेळी झाली.”