भारताचे माजी सरन्यायाधीश पलानीसामी सथशिवम यांचा शुक्रवारी केरळचे राज्यपाल म्हणून शपथविधी झाला, ते केरळचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी श्रीमती शीला दीक्षित या केरळच्या राज्यपाल होत्या.
पासष्ट वर्षांचे सथशिवम यांची नियुक्ती करण्यावर कायदेशीर व राजकीय वाद निर्माण झाले होते. शुक्रवारी केरळ उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश अशोक भूषण यांनी त्यांना राजभवनात अधिकारपदाची शपथ दिली. सदाशिवम यांच्या पत्नी सरस्वती सदाशिवम यावेळी उपस्थित होत्या. सदाशिवम हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. माजी सरन्यायाधीशास राज्यपाल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री ओमेन चँडी, राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन, राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष जी. कार्तिकेयन हे उपस्थित होते. विरोधी डाव्या लोकशाही आघाडीचे नेते व्ही. एस. अच्युतानंदन अनुपस्थित होते.
विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता असे सांगण्यात आले की, कार्यक्रमाची सूचना नसल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. सरकारने असे म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्यांना कार्यक्रमास बोलावले नव्हते हे खरे नाही कारण त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले होते त्यांच्यासाठी पहिल्या रांगेत आसनही आरक्षित ठेवले होते.