पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी संध्याकाळी पद्म पुरस्कार विजेत्या मान्यवरांशी दिल्लीत संवाद साधला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील एकूण १०६ मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी घोषणा करण्यात आली. यातील ५२ मान्यवरांना बुधवारी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यापैकी दोन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि ५४ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यावेळी कर्नाटकमधील बिदरी कारागिरीसंदर्भात दिलेल्या योगदानासाठी राशिद कादरी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मोदींशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
“UPA च्या काळात पुरस्कार मिळेल असं वाटलं होतं. पण..”
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी या पुरस्कारप्राप्त मान्यवरांशी संवाद साधला. त्यावेळी राशिद कादरी यांना पंतप्रधान अभिवादन करत असताना त्यांनी गेल्या १० वर्षांपासून या पुरस्कारासाठी प्रयत्न करत असल्याचं नमूद केलं. “मी गेल्या १० वर्षांपासून या पुरस्कारासाठी प्रयत्न केले. यूपीएच्या काळात हा पुरस्कार मिळेल असं मला वाटलं होतं. पण ते होऊ शकलं नाही”, असं कादरी मोदींना म्हणाले.
“मला वाटलं, आता भाजपा मला पुरस्कार देणार नाही”
मोदींनी कादरींशी हात मिळवला असता त्यांचा हात हातात घेऊनच राशिद कादरी त्यांच्याशी बोलत होते. ते म्हणाले, “जेव्हा भाजपाचं सरकार सत्तेत आलं, तेव्हा मला वाटलं की आता भाजपा मला कोणताही पुरस्कार देणार नाही. पण तुम्ही मला खोटं ठरवलं. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे”, असं कादरी म्हणाले.
कार्यक्रमानंतर एएनआयशी बोलताना कादरींनी यावर भूमिका मांडली. “भाजपा कधीच मुस्लिमांना काहीही देत नाही असं मला वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी या पुरस्कारासाठी निवड करून मला खोटं ठरवलं”, असं कादरी म्हणाले.
Video: “आता ते म्हणतायत मोदी तेरी कबर खुदेगी”, मोदींचं काँग्रेसवर टीकास्र; म्हणाले, “त्यांना एक गोष्ट माहिती नाहीये की…”
राशिद कादरी यांचा जन्म ५ जून १९५५ रोजी झाला. बिदरी कारागिरी करणाऱ्या कुटुंबातून त्यांच्यावर कारागिरीचे संस्कार झाले. आत्तापर्यंत कादरी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात कर्नाटक राज्य पुरस्कार, एक राष्ट्रीय पुरस्कार आणि जिल्हा राज्योत्सव पुरस्कार यांचा समावेश आहे.