विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या धोरणांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ख्यातनाम योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांची यावर्षीच्या पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणारे पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या १२७ जणांच्या नावांची घोषणा राष्ट्रपती भवनातून शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समित्यांचे सदस्य राहिलेले डॉ. माशेलकर हे केंद्र सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालकही होते. याआधी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. माशेलकर यांच्यासह महाराष्ट्रातील २१ जणांचा पद्मविजेत्यांच्या यादीत समावेश आहे. गेल्या वर्षी पुण्यात निर्घृण हल्ल्यात मारले गेलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरोधात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला. याशिवाय दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर बलात्कार कायद्यात कडक तरतुदी सुचवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख माजी न्यायमूर्ती जगदीश शरण वर्मा यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रांतून ‘पद्म’साठी निवड झालेल्यांमध्ये गायिका बेगम परवीन सुलताना, प्रा. ज्येष्ठराज जोशी, टेनिसपटू लिएंडर पेस, नयना आपटे-जोशी, तबलावादक विजय घाटे, अभिनेता परेश रावल, अभिनेत्री विद्या बालन यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू युवराज सिंग, अभिनेता कमल हासन, रस्कीन बाँड, पी. गोपीचंद यांनाही पद्मने गौरवण्यात आले आहे.
आईची आठवण झाली
सकाळी सात वाजता मला केंद्रीय गृह मंत्रालयातून फोन आला आणि पद्मविभुषण जाहीर झाल्याचे कळले आणि मला पटकन माझ्या आईची आठवण आली. आज मी जे काही आहे ते केवळ माझ्या आईमुळेच. देशाने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी सीएसआयआरमधून निवृत्त होत होतो त्यावेळेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते की, डॉ. माशेलकर यांचे जीवन आणि कार्य हे दोन्ही तरूणांना प्रोत्साहन देणारे आहे. पण अजून तुमचे सर्वोत्तम येणे अपेक्षित आहे. त्यांच्या या वाक्याची मला आठवण झाली आणि मला माझे सर्वोत्तम असे द्यायचे आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा