अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले सूरतचे सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत. सावजी ढोलकिया हे सूतरमधील प्रसिद्ध हरी कृष्ण डायमंड कंपनीचे मालक आहेत. यावेळी ते चर्चेत येण्यामागचं कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. सावजी ढोलकिया यांनी त्यांचे ५० कोटी रुपयांचे एलिकॉप्टर दान केले आहे. हे हेलिकॉप्टर त्यांनी वैद्यकीय आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी दान केले आहे. देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यानंतर ढोलकिया यांना त्यांच्या कुटुंबीयांनी हेलिकॉप्टर भेट दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, सावजी ढोलकिया हे मागच्या अनेक दिवसांपासून सुरतच्या लोकांना हेलिकॉप्टर भेट देण्याचा विचार करत होते. त्यातच कुटुंबाकडून सरप्राईज गिफ्टमध्ये हेलिकॉप्टर मिळाल्याने त्यांनी हे हेलिकॉप्टर भेट देण्याचा आपला निर्णय जाहीर केला. सावजी ढोलकिया म्हणाले की, “मला माझे कुटुंबीय एवढं मोठं सरप्राईज गिफ्ट देणार आहे हे मला माहीत नव्हते. मी माझ्या कुटुंबाकडून भेट नाकारू शकलो नाही. त्यामुळे ते मी घेतलं आणि नंतर मनापासून सामाजिक कारणांसाठी भेट देण्याचा निर्णय घेतला.”

ढोलकिया पुढे म्हणाले की, “सुरत ही गुजरातची आर्थिक राजधानी आहे, पण या शहराजवळ स्वतःचे हेलिकॉप्टर नाही. त्यामुळे मी ही भेट सुरतच्या जनतेला आणि सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांना समर्पित करत आहे.” विशेष म्हणजे, ढोलकिया यांनी आपले जीवन जलसंवर्धन आणि पाण्याची कमतरता असलेल्या सौराष्ट्र प्रदेशात तलाव खोदण्यासाठी समर्पित केले आहे. त्यांनी सौराष्ट्रातील अमरेली जिल्ह्यातील लाठी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावाभोवती ७५ हून अधिक तलाव बांधले आहेत. हे सर्व तलाव अकाळा, दुधला, लाठी गाव या गावांतील ओसाड सरकारी जमिनीवर बांधण्यात आले आहेत.

महिला हॉकी संघासाठी सावजी ढोलकिया यांनी गिफ्ट देण्याची केली होती घोषणा…

भारतीय महिला हॉकी संघ टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर संघाचं मनोबल उंचावण्यासाठी हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी मोठी घोषणा केली होती “महिला हॉकी संघाने अंतिम सामना जिंकला, तर हॉकी संघातील महिला खेळाडूंना हरि कृष्णा ग्रुपच्या वतीने ११ लाख रुपयांचं घर किंवा नवीन कार भेट दिली जाईल. आपल्या मुली टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक पावलांवर इतिहास रचत आहेत, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे”, असं ढोलकिया यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma shri awardee savji dholakia owner of hari krishna diamond firm gifted helicopeter to surat city hrc