या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत २९ महिलांचा समावेश आहे.

सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, नामदेव कांबळे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल, लोककलावंत परशुराम गंगावणे यांना कलाक्षेत्रातील आणि जसवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला. पंजाबमधील उद्योजिका रजनी बेक्टर यांना पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई, गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला.

राष्ट्रपतींनी सात पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री असे ११९ पद्म पुरस्कार देण्यास मान्यता दिली आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले. या यादीत २९ महिलांचा समावेश आहे. १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

‘पद्मश्री’ पुरस्कार मिळणे अनपेक्षितच आहे. उपेक्षित, वंचित वर्गासाठी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार आहे.  पारधी, भटक्या विमुक्तांच्या व्यथा, वेदना समजल्या, त्यावर काही उपाययोजना करू शकलो.

– गिरीश प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते

मी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळजवळ पिंगुळी या माझ्या गावी ‘ठाकर आदिवासी लोककला अंगण’ गोठय़ात सुरू केले. लोककला जगल्या पाहिजेत हा ध्यास घेतला.  ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्या कामाचे सार्थक झाले आहे.

-परशुराम गंगावणे, लोककलावंत

आज माझ्या आयुष्यावर कळस चढला, पण मला भूतकाळ विसरता येत नाही. त्याला पाठीशी बांधून वर्तमानकाळाचा शोध घेतला. मला बळ दिलेल्या लेकरांचा पुरस्कारावर जास्त अधिकार आहे.

– सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्यकर्त्यां