Pahalgam Terror Attack Updates: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातील मृतांपैकी एक असलेल्या एन रामचंद्रन यांच्या मुलीने, आपल्या वडिलांची डोळ्यादेखत हत्या होताना पाहिले आहे. रामचंद्रन यांची मुलगी आरतीने नुकतेच त्या भयानक क्षणाचा घटनाक्रम माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.
गोळीबार वाढताच आम्ही पळू लागलो
पहलगाममधील हल्ल्याचा घटनाक्रम सांगतला आरती म्हणाली की, “गोळीबाराचा आवाज ऐकू येताच मी माझ्या वडिलांना विचारले की, हा आवाज कशाचा आहे. त्यांनी सांगितले की त्यांना खात्री नाही. पण, गोळीबाराचा आवाज आणखी वाढताच आम्ही पळू लागलो. आम्हाला इतर लोकही धावताना दिसले. घटनास्थळी गोंधळ उडाला होता. अचानक आम्हाला एक व्यक्ती बंदूक घेऊन येताना दिसला.”
“आमच्या शेजारी पर्यटकांचे दोन-तीन गट होते. बंदूकधारी व्यक्ती पर्यटकांना काहीतरी विचारायचा आणि नंतर तो त्यांच्यावर गोळीबार करायचा. हे पाहूण मी घाबरले आणि वडिलांना सांगितले की, तो व्यक्ती आपल्याकडे येत आहे. माझे वडील शांत होते आणि म्हणाले की काय होते ते पाहूया. तो माणूस आमच्याकडे आला आणि ‘कलमा’ या शब्दाचा उल्लेख केला. तो काय बोलत आहे ते आम्हाला समजेपर्यंत त्याने माझ्या वडिलांना गोळी घातली.”
एन रामचंद्रन त्यांची पत्नी, मुलगी आणि नातवंडांसह काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मित्राने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “त्यांचे निधन आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. त्यांनी सुमारे २० वर्ष आखाती देशात नोकरी केल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये निवृत्तीचे जीवन जगत. त्यांची मुलगी दुबईला असते तर, त्यांचा मुलगा बेंगळुरूमध्ये काम करत असतो.”
पर्यटकांवरील सर्वत भीषण हल्ला
अलिकडच्या काळात पर्यटकांवर झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक असलेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. तसेच यामध्ये अनेकजण जखमी झाले आहे. दरम्यान मृतांमध्ये भारतीय नौदलाचा २६ वर्षीय लेफ्टनंटचाही समावेश होता. तो त्याच्या लग्नाच्या काही दिवसांनंतरच त्याच्या पत्नीसह काश्मीरला पर्यटनासाठी आला होता. दरम्यान या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.