Pahalgam Attack पहलगाम हल्ल्याचा थरार एका पर्यटकाच्या व्हिडीओत कैद झाला आहे. ऋषी भट्ट असं या पर्यटकाचं नाव आहे. पहलगाम हल्ल्याला सात दिवस पूर्ण झाल्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे. पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमावावा लागला. या घटनेचा देशभरातून आणि जगभरातून निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान हा नवा व्हिडीओ आता समोर आला आहे.
ऋषी भट्टने या पर्यटकाने व्हिडीओबाबत काय सांगितलं?
ऋषी भट्ट या पर्यटकाचा हा व्हिडीओ आहे. त्याने सांगितलं “मी पहलगामला झिपलाईनवर होतो. त्यावेळी मी व्हिडीओ अगदी सहज म्हणून घेतला. मला माहीतही नव्हतं की दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला आहे. पण ती घटना माझ्या मोबाइल व्हिडीओत नकळत कैद झाली. असं ऋषी भट्टने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. ऋषी भट्ट यांचा अहमदाबादमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. भट्ट त्यांच्या कुटुंबासह १६ ते २७ एप्रिल या कालावधीसाठी काश्मीरला सुट्टीसाठी आले होते. त्यावेळी २२ तारखेला म्हणजेच मागच्या मंगळवारी हा हल्ला झाला. ऋषी भट्ट यांच्यासह त्यांची पत्नी भक्ती आणि मुलगा प्रीतही होते.”
२० सेकंदांनी मला समजलं की हल्ला झाला आहे
मी झिपलाईन राईडवरुन व्हिडीओ घेत होतो. साधारण २० सेकंदांनी मला कळलं की दहशतवादी हल्ला झाला आहे. चार ते पाच लोक गोळी लागून खाली पडले आहेत. दोन ते तीन गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा मला हा हल्ला असेल असं काही वाटलं नाही. पण मी जेव्हा गोळ्यांचा आवाज मोठ्या प्रमाणावर ऐकला आणि दोन तीन जणांना खाली पडताना पाहिलं तेव्हा हा दहशतवादी हल्ला आहे हे लक्षात आलं. मी माझ्या मोबाइलला सेल्फी स्टिक लावली होती आणि हा व्हिडीओ घेत होतो, असंही भट्ट यांनी सांगितलं.

माझी पत्नी आणि मुलगा ओरडत होते की…
पुढे ऋषी भट्ट म्हणाले, माझी राईड संपताना मी पाहिलं की माझा मुलगा आणि पत्नी ओरडत होते, मला व्हिडीओ घेऊ नकोस असं सांगत होते. मी तातडीने व्हिडीओ शूट करणं थांबवलं आणि राईड संपताच तातडीने बेल्ट काढला आणि माझ्या पत्नी आणि मुलाच्या दिशेने धावलो. माझ्या पत्नीने मला सांगितलं की दहशतवाद्यांनी दोघांना ठार केलं आहे. त्यांना धर्म विचारण्यात आला आणि ठार करण्यात आलं असंही माझ्या पत्नीने मला सांगितलं. मी देखील त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन मृतदेह पाहिले असंही ऋषी भट्ट यांनी सांगितलं.