Pakistani Citizens In India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मोदी सरकारने तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर अनेक नागरिकांनी भारत सोडला आहे. मात्र, देशभरात असे अनेक पाकिस्तानी नागरिक आहेत, जे अनेक दशकांपासून भारतात राहत आहेत. त्यांना आता देश सोडण्याच्या नोटीसा आल्या आहेत. पण, त्यांना भारत सोडण्याची इच्छा नाही.

दरम्यान ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील सोरो येथे गेल्या अनेक दशकांपासून राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिक रझिया सुलताना यांनाही भारत सोडण्याची नोटीस आली आहे. रझिया सुलताना ७२ वर्षांच्या आहेत आणि त्यांनी मोदी सरकारकडे, त्यांना भारतातून बाहेर काढू नये अशी विनंती केली आहे. रझिया सुलताना म्हणाल्या, “जर मी काही चूक केली असेल तर सरकार मला गोळ्या घालाव्या पण देशाबाहेर काढू नये.”

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रझिया वयाच्या चौथ्या वर्षापासून भारतात राहत आहेत. रझिया यांची तब्येतही खराब आहे आणि किडनीचा आजारही आहे. १० मे रोजी त्यांना भुवनेश्वरला डॉक्टरकडे जायचे आहे. रझिया यांच्या कुटुंबाने केंद्र सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि त्यांना पाठवलेली नोटीस मागे घ्यावी अशी विनंती केली आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून रझिया सुलताना भारतात

रझिया यांचे वडील हैदर अली हे मूळचे बिहारचे होते. देशाच्या फाळणीनंतर ते बांगलादेशला आणि तेथून ते पाकिस्तानला गेले होते. रझिया सुलताना यांचा जन्म १९५३ मध्ये पाकिस्तानात झाला. त्यानंतर अवघ्या चार वर्षांनी त्यांचे वडील हैदर अली भारतात परतले. तेव्हापासून रझिया भारतात राहत आहेत. रझिया यांचे लग्न सोरो येथील शेख शमसुद्दीन यांच्याशी झाले आहे आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या पतीचे २०२३ मध्ये निधन झाले होते.

चार दिवसांत शेकडो पाकिस्तानी नागरिक परतले

गेल्या चार दिवसांत अटारी सीमेवरून एकूण ५३७ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. देशभरातील राज्य सरकारे आणि सुरक्षा संस्था याबाबत कारवाई करत आहेत. दुसरीकडे, १४ राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह एकूण ८५० भारतीय पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.