India Pakistan Tensions Updates : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले. २२ एप्रिल रोजी हा हल्ला झाला असून तेव्हापासून सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवाद्यांचा छडा लावण्यासाठी मोहीम उघडली आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अनेक पथकं या दहशतवाद्यांचा छडा लावण्यासाठी कित्येक किलोमीटर पालथ घालत आहेत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापरही तपास यंत्रणांकडून केला जात आहे. हल्ला झाल्यापासून पाच दिवसांत चार वेळा या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा तपास यंत्रणांना लागला खरा, पण गर्द जंगलाचा आश्रय घेत त्यांनी पळ काढला. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं सविस्तर वृत्त दिलं आहे.

हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणांनी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक नागरिक, गुप्तहेर खातं यांच्यामार्फत या दहशतवाद्यांची माहिती गोळा केली जात आहे. त्या माहितीच्या आधारेच हल्ल्यानंतर आत्तापर्यंत तब्बल ४ वेळा या दहशतावाद्यांचा ठावठिकाणा तपास पथकांना समजला खरा. पण घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी तिथून पळ काढल्याचं लष्करातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

“गेल्या पाच दिवसांत चार वेळा दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागला. तपास पथकानं लागलीच कारवाईही केली. पण दहशतवादी तिथून पळून गेले. एकता तर दोन्ही बाजूंनी गोळीबारही झाला. दक्षिण काश्मीरच्या घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन दहशतवादी लपून बसले आहेत”, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

दहशतवाद्यांच्या पाठलागाचा थरार

“ही उंदीर आणि मांजराची शर्यत आहे. असेही काही प्रसंग आले जेव्हा दहशतवाद्यांना प्रत्यक्ष पाहिल्याची माहितीही आम्हाला मिळाली. पण जोपर्यंत सुरक्षा पथकं तिथे पोहचले, तोपर्यंत त्यांनी पोबारा केला होता. इथलं जंगल खूप घनदाट आहे. अशा ठिकाणी कुणाला शोधणं कठीण काम असतं. पण आम्ही त्यांना लवकरच पकडू. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे”, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी सर्वप्रथम पहलगाममधल्या हपत नार गावात आढळून आले. पण तिथून त्यांनी पळ काढला. त्यानंतर कुलगामच्या जंगलात त्यांना पाहिलं गेल्याची माहिती तपास पथकांना मिळाली. तिथे दोन्ही बाजूंनी गोळीबारही झाला. पण तिथूनही त्यांनी पळ काढला. त्यानंतर कोकरनागच्या त्राल परिसरात ते आढळल्याची माहिती लष्कराला मिळाली. सध्या ते तिथल्याच आसपासच्या जंगलात असल्याचं सांगितलं जात आहे.

दहशतवाद्यांची सतर्क हालचाल

दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी जंगलात आश्रय घेऊन राहत असले, तरी सतर्क हालचाली करत असल्याचं एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं. “सामान्यपणे दहशतवाद्यांना अन्नाची सोय करण्यासाठी गावांमध्ये यावं लागतं. कधीकधी त्यांना काही स्थानिक मदतनीसांकडून जंगलात अन्नपुरवठा केला जातो. यातून माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि त्यात दहशतवादी पकडले जाण्याची शक्यता बळावते. पण हे दहशतवादी फार काळजीपूर्वक हालचाली करत आहेत”, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.

“एका गावात रात्रीच्या जेवणाच्या वेळी हे दहशतवादी गेले, एका घरात घुसले आणि शिजवलेलं अन्न घेऊन पळून गेल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सुरक्षा पथक तिथे पोहोचेपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. या काळात दहशतवादी पळून गेले”, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

कमी बर्फवृष्टी, तपास यंत्रणांसमोरचं आव्हान

दरम्यान, किश्तवार डोंगररांगांमध्ये यंदा कमी बर्फवृष्टी झाल्यामुळे या डोंगररांगा पार करून जम्मूच्या बाजूच्या घनदाट जंगलात शिरण्याचा पर्याय दहशतवाद्यांना उपलब्ध झाला आहे. या भागात जंगल अधिक घनदाट आहे. या किश्तवार डोंगररांगांमध्ये त्यांचा वावर गेल्या काही दिवसांत राहिला आहे. पण सध्या तरी ते दक्षिण काश्मीरमध्येच असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे”, असंही या अधिकाऱ्याने नमूद केलं.

दहशतवाद्यांकडे पर्यटकांचे दोन मोबाईल फोन

दरम्यान, दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर तिथल्या पर्यटकांचे दोन मोबाईल फोन नेल आहेत. स्थानिक पातळीवर किंवा सीमेपलीकडे संपर्क साधण्यासाठी हे दहशतवादी या मोबाईल फोनचा वापर करतील आणि तिथे आम्हाला माहिती मिळेल अशी आमची अपेक्षा असल्याचंही या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.