House Of another Lashkar terrorist Farooq Ahmed ulown up Video : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादाविरोधात मोहिम उघडली आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी देखील झाले आहेत. यानंतर गेल्या ४८ तासांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमधील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

नुकतेच करण्यात आलेल्या कारवाईत कुपवाडा येथे लष्कर-ए-तैयबाचा चा दहशतवादी फारुख अहमद याचे घर उडवून देण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर करण्यात आलेली अशा प्रकारची ही सहावी कारवाई आहे. फारुखच्या घराबरोबरच इतर दहशतवाद्यांशी संबंधित मालमत्तांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

यामध्ये अनंतनाग जिल्ह्यातील ठोकरपुरा येथील आदिल अहमद ठोकर , एहसान उल हक शेख याचे पुलवामामधील मुररान येथील घर, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शिपोयांमधील चोटीपोरा शाहिद अहमद कुट्टे आणि कुलगाममधील मतलहामा येथील जाहिद अहमद गनीय याचे घर पाडण्यात आले आहे.

सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय असलेल्या दोन दहशतवाद्यांची घरे पाडली. बिजबेहरा येथील लष्करचा दहशतवादी आदिल हुसैन ठोकर याचे घर आयईडी वापरून उडवून देण्यात आले, तर आसिफ शेख याचे त्राल येथील घर बुलडोझरने पाडण्यात आले.

आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल ठोकर यांने पहलगाम हल्ल्यात सहभागी पाकिस्तानी दहशतवाद्यांना आसरा दिल्याचा आरोप आहे. ठोकर हा २०१८ साली पंजाबमधील अटारी-वाघा बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात गेला होता. येथे त्याला दहशतवादी कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तो नंतर गेल्या वर्षी घुसखोरी करून जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाला.

माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षिस

अनंतनाग पोलिसांनी ठोकर आणि इतर दोन पाकिस्तानी नागरिकांना पकडून देण्यासाठी माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. अली भाई आणि हाशिम मुसा अशी त्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे आहेत. याबरोबरच पोलिसांनी या दहशतवाद्यांचे स्केच देखील जारी केले आहे.

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी ४ ते ५ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता, या हल्ल्यात २६ जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.