Pahalgam Terror Attack Militant’s Sister : पहलगाम हल्ल्यात सहभागी दोन दहशतवाद्यांच्या घरांवर शुक्रवारी (२५ एप्रिल) संरक्षण यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी धाडी मारल्या. त्यापैकी एका दहशतवाद्याचं घर प्रशासनाने उद्ध्वस्त केलं, तर दुसऱ्याचं घर अज्ञातांनी बॉम्बने उडवलं. यापैकी एका दहशतवाद्याचं नाव आसिफ शेख असून काश्मीर खोऱ्यातील त्राल येथील त्याचं घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आलं आहे तर, त्याचा साथीदार आदिल हुसैन याचं घर बॉम्ब स्फोटात (आयईडी) बेचिराख झालं आहे. दरम्यान, आसिफ शेखच्या बहिणीने तिच्या भावाचं उद्ध्वस्त झालेलं घर पाहून टाहो फोडला.

आसिफच्या बहिणीने यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. ती म्हणाली, “माझा एक भाऊ तुरुंगात आहे. तर, दुसरा मुजाहिद्दीन आहे. माझ्या दोन बहिणी देखील आहेत. परवा जवानांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी नेलं. तेव्हा मी माझ्या सासरवाडीत होते. मी इथे दाखल झाले तेव्हा घरात कोणीच नव्हतं. माझ्या आईला व बहिणींना पोलिसांनी चौकशीसाठी नेलं आहे.”

भारतीय जवानाचा गणवेश परिधान केलेल्या एका माणसाने आमच्या घरात बॉम्ब ठेवला : यास्मीन

आसिफची बहीण म्हणाली, “मी इथे आले तेव्हा संरक्षण दलाचे जवानही इथेच होते. त्यांनी आम्हाला घराबाहेर जाण्यास सांगितलं. मी पाहिलं की एका माणसाने माझ्या घरातील अडगळीच्या खोलीत बॉम्बसारखी वस्तू ठेवली. मी स्वतः त्या माणसाला पाहिलं. त्याने भारतीय जवानाचा गणवेश परिधान केला होता. त्यानंतर त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि क्षणार्धात आमचं घर बेचिराख झालं.”

पाकिस्तानी दहशतवादी दोन वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास होते?

दरम्यान, अनतंनाग पोलिसांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आदिल हुसैनबाबत व इतर दोन पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. दुसऱ्या बाजूला या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संरक्षण दलाने मोठी शोधमोहीम हाती घेतली असून या दहशतवाद्यांचे फोटो व रेखाचित्र प्रसारित करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितलं की पाकिस्तानातून आलेले दोन दहशतवादी मूसा व अली हे दोघे दोन वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात सक्रीय आहेत. दोघे अनेक दिवसांपासून अशा दहशतवादी कारवाईची तयारी करत होते.