Bangladesh Nationals Detained in Gujarat : गुजरात पोलिसांनी शनिवारी पहाटे ३ वाजता सुरू केलेल्या कारवाईत अहमदाबाद आणि सुरत या दोन प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १,०२४ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. अहमदाबादमध्ये ८९० तर सुरतमध्ये १३४ लोकांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी मध्यरात्री झालेल्या या कारवाईला गुजरात पोलिसांसाठी “ऐतिहासिक विजय” म्हटले. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. परंतु, शनिवारी गुजरातमध्ये ताब्यात घेण्यात आलेले नागरीक बांगलादेशी असल्याचा दावा करण्यात येत आहे. अहमदाबादमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी पहाटे सांगितले की, “आज सकाळी ३ वाजल्यापासून अहमदाबाद गुन्हे शाखेने एसओजी, ईओडब्ल्यू, झोन ६ आणि मुख्यालयातील पथकांसह अहमदाबाद शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी स्थलांतरितांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईदरम्यान, ४०० हून अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आहे.” तर, दुपारपर्यंत ही संख्या ८९० पर्यंत पोहोचली. अहमदाबाद शहरातील चांदोला तलाव परिसरातून बहुतेक लोकांना ताब्यात घेण्यात आले.
पकडलेल्या बांगलादेशींची रस्त्यांवर परेड
अटक केलेल्यांना प्रथम कांकरिया फुटबॉल ग्राउंडवर ठेवण्यात आले आणि नंतर शहरातील रस्त्यांवरून गुन्हे शाखेच्या गायकवाड हवेली मुख्यालयात परेड करून नेण्यात आले, पोलिसांनी लाँग मार्चचे ड्रोन व्हिडिओ प्रसारित केले. नंतर सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यव्यापी पोलीस बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये गुजरातचे पोलीस महासंचालक (डीजीपी) विकास सहाय अहमदाबादहून तर गृहराज्यमंत्री हर्ष संघवी सुरतहून सामील झाले.
गुजरात पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई
बैठकीनंतर बोलताना मंत्री संघवी म्हणाले, “गुजरात पोलिसांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अहमदाबाद पोलिसांनी ८९० बेकायदेशीर बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे आणि सुरत पोलिसांनी १३४ जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरात पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रे बनवून (पश्चिम) बंगालमधून बेकायदेशीरपणे येतात आणि गुजरात आणि भारतातील इतर राज्यांमध्ये पोहोचतात. त्यापैकी बरेच जण ड्रग्ज कार्टेल, मानवी तस्करीमध्ये सहभागी आहेत. तसंच, अल कायदासाठी स्लीपर सेल म्हणून काम करताना दोन बांगलादेशींना पकडण्यात आले होते.”
बेकायदेशीर स्थलांतरितांना शरण येण्याचे आवाहन
संघवी यांनी इतर सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना स्थानिक पोलीस ठाण्यात शरण जाण्याचा करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, “या सर्व बांगलादेशींच्या पार्श्वभूमी कारवायांची चौकशी सुरू आहे आणि मी त्यांना एक स्पष्ट संदेश देऊ इच्छितो. एकतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जा आणि २ दिवसांच्या आत बेकायदेशीर बांगलादेशी म्हणून आत्मसमर्पण करा, अन्यथा गुजरात पोलिस “ना भूतो ना भविष्य” प्रकारची कठोर कारवाई करतील.
बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्यासाठी मदत करणाऱ्यांना इशारा देताना संघवी म्हणाले, “जर एकाही घुसखोराला आश्रय दिला तर त्यांचीही अवस्था वाईट होईल. त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांसाठी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांची पोलीस चौकशी करतील असेही त्यांनी सांगितले.