Pahalgam Terror Attack Pakistani nationals Returns Home : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारत सरकार आक्रमक झालं आहे. अशातच केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्यास सांगितलं होतं. पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. या मुदतीत, म्हणजेच २३ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण अटारी सीमेवरून पाकिस्तानला परतले आहेत.

याच चार दिवसांच्या काळात (२३ ते २७ एप्रिल) ८५० भारतीय नागरिक पाकिस्तानहून भारतात परतले आहेत. या नागरिकांनी देखील अटारी सीमेचाच वापर केला.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने १२ श्रेणींमधील शॉर्ट-टर्म व्हिसाधारक पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत जाण्यास सांगितलं होतं. त्यानुसार ९ अधिकाऱ्यांसह ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत.

८५० भारतीय नागरिक पाकिस्तानहून मायदेशी परतले

दरम्यान, एका अधिकाऱ्यासह ११६ भारतीय नागरीक रविवारी (२७ एप्रिल) अटारी-वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानहून भारतात परतले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी १६ अधिकाऱ्यांसह ३४२ भारतीय नागरिक परतले आहे. २५ एप्रिल रोजी २८७ व २४ एप्रिल रोजी १०५ भारतीय नागरिक स्वगृही परतले आहेत. या सर्वांनी अटारी-वाघा सीमेचा वापर केला.

काही पाकिस्तानी नागरिकांकडून हवाई मार्गाचा वापर

अटारी चौकीवर तैनात प्रोटोकॉल अधिकारी अरुण महल यांनी सांगितलं की “२४ ते २७ एप्रिलदरम्यान एकूण ५३७ पाकिस्तानी नागरिकांनी अटारी-वाघा सीमेवरील मार्गाने भारतात परतले. तर ८५० भारतीय नागरिक पाकिस्तान सोडून भारतात परतले आहेत.” दरम्यान, काही पाकिस्तानी नागरिक हवाई मार्गाने मायदेशी परतले आहेत. भारत व पाकिस्तानदरम्यानची थेट हवाई वाहतूक बंद असल्यामुळे हे पाकिस्तानी नागरिक थेट पाकिस्तानला न जाता इतर देशांमध्ये उतरून तिथून दुसऱ्या विमानाने मायदेशी परतले असावेत.

सार्क व्हिसाधारकांना २६ एप्रिलच्या आधी भारत सोडण्यास सांगितलं होतं तर वैद्यकीय व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत मायदेशी परतावं लागणार आहे. व्हिसा ऑन अरायव्हल, बिझनेस, चित्रपट, पत्रकारिता, ट्रान्झिट, कॉन्फरन्स, गिर्यारोहण, विद्यार्थी, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठीचा व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडून जाण्यास सांगितलं होतं.