Pahalgam terror attack : जम्मू काश्मीरच्या पहलागाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर टाटा समूहाच्या एअर इंडिया या विमान कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी दोन जादा विमानं श्रीनगरहून उड्डाण करणार आहेत. तसंच ३० एप्रिल पर्यंत श्रीनगरसाठी ये-जा करणाऱ्या विमानांची वेळ बदलणं आणि तिकिट रद्द केल्यास पूर्ण रिफंड या दोन सेवा सुरु केल्या आहेत.
पर्यटकांवर दहशतवादी हल्ला
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पहलगाममध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याने काश्मीरमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. रामबन जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. यामुळेही टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सकडून अडकलेल्या पर्यटकांना हवाई मार्गाने बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर टाटांच्या एअर इंडिया या विमान कंपनीने ३० एप्रिल पर्यंत रिफंड आणि कॅन्सलेशनच्या सेवा मोफत दिल्या आहेत.
एअर इंडियाने दिल्या या मोफत सेवा
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पर्यटक चिंतेत आहेत. प्रत्येकाला आपलं घर गाठणं महत्त्वाचं वाटतं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज श्रीनगहून दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त विमानांची उड्डाणं होणार आहेत. श्रीनगरहून दिल्लीसाठी सकाळी ११.३० वाजता विमान उड्डाण करणार आहे. तर श्रीनगर ते मुंबई हे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करणार आहे. या विमानाच्या तिकिटांचं बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. श्रीनगरहून जाणारी इतर विमाने वेळापत्रकाप्रमाणे असतील असंही एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे. एअर इंडियाने या श्रीनगरसाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत कन्फर्म बुकिंग असलेल्या प्रवाशांना कॅन्सलेशन आणि रिशेड्यूलिंग या दोन सेवा मोफत पुरवल्या आहेत. तिकिट रद्द केल्यास प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसची विमानं श्रीनगरहून बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या ठिकाणांसाठी थेट फ्लाईट आहेत. तसंच एअर इंडिया कंपनीची विमानं दिल्ली आणि मुंबई या ठिकाणीही विमानसेवा पुरवते. इंडिगो, अकासा, स्पाईसजेट या कंपन्यांची विमानंही श्रीनगरला ये-जा करतात.
प्रत्यक्षदर्शींनी काय काय सांगितलं?
एका पर्यटकाने सांगितल्यानुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांना नावं विचारुन ठार केलं. एक महिला रडत तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी टाहो फोडत होती हे दृश्यही कॅमेरात कैद झालं आहे. जो माणूस व्हिडीओ रेकॉर्ड करत होता तो तिला शांत राहण्याचं आवाहन करत होता असाही एक व्हिडीओ समोर आला आहे. एक लहान मुलगा सांगतो ते लोक समोरुन आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. माझ्या नवऱ्याला दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केलं असं एका आक्रोश करणाऱ्या महिलेने सांगितलं.