Pahalgam Terrorists in Anantnag: पहलगाममध्य दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेला सात दिवस उलटले असून यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता एकीकडे बोलून दाखवली जात असताना दुसरीकडे लष्कर, काश्मीर पोलीस, एनआयए यांची शोधपथकं हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी काश्मीर पिंजून काढत आहेत. हे दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याची बोललं जात असून तिथे ही पथकं शोध घेत आहेत. अशातच, हे दहशतवादी दीड वर्षापूर्वीच भारतात दाखल झाल्याचं समोर आलं आहे!

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी दीड वर्षापूर्वीच पाकिस्तानमधून भारतात दाखल झाल्याचं सांगितलं जात आह. त्यांच्यासह इतरही काही घुसखोर भारतीय हद्दीत दाखल झाले होते. सीमेवरील सांबा-कथुआ भागात तारांचं कुंपण तोडून हे सर्व दहशतवादी भारतीय हद्दीत आले होते. तेव्हापासून भारतात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घुसखोरीची चौकशी झाली होती, पण…

दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेल्या या घुसखोरीची चौकशीही झाली होती आणि त्यासंदर्भात सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचं केंद्रीय गृह मंत्रालयाशी बोलणंही झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.

दहशतवादी अनंतनागमध्ये लपले?

दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला केलेले दहशतवादी अनंतनागमध्ये लपल्याचा संशय तपास पथकांना आहे. अनंतनागच्या वरच्या भागात हे दहशतवादी लपले असून त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर, राष्ट्रीय रायफल्स व निमलष्करी दलाकडून स्थानिकांची मदत घेतली जात आहे. शिवाय, जम्मू-काश्मीर पोलिसांकडून यासाठी तंत्रज्ञानाचीही मजत घेतली जात आहे.

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांची नावं अली भाई उर्फ तल्हा आणि हाशीम मुसा उर्फ सुलेमान अशी आहेत. पोलिसांनी त्यांची रेखाटने जारी केली असून त्यांच्यासोबत लष्कर ए तैय्यबाचा दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याचंही रेखाटन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शिवाय, त्यांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचा इनामही पोलिसांनी जाहीर केला आहे. यापैकी मुसा हा गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी सोनमर्गमध्ये झालेल्या झेड-मोर्ह भुयार स्फोट प्रकरणातील संशयित आहे.

कशी पटली दहशतवाद्यांची ओळख?

दरम्यान, पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक बाबींचा वापर केला. त्यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, पर्यटकांनी व स्थानिक गाईडनी काढलेले घटनेचे व्हिडीओ आणि सुरक्षा पथकांकडे खोऱ्यातील दहशतवाद्यांची असलेली माहिती, यांची सांगड घातल्यानंतर या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली.

“पहलगाम घटनेच्या प्रत्यक्षदर्शींना दहशतवाद्यांचे अनेक फोटो दाखवण्यात आले. त्यातल्या एका फोटोमध्ये त्यांनी मुसाला ओळखलं. तिथून इतर दहशतवाद्यांची ओळखदेखील पटली”, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मुसाचा फोटो तपास पथकांना दहशतवादी जुनैद अहमद भटच्या मोबाईल फोनमध्ये सापडला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दाचीगम जंगलात झालेल्या चकमकीत भट मारला गेला होता. त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू व फोटोंच्या आधारे पोलिसांनी इतर दहशतवाद्यांची माहिती जमा केली.