Terror Attack Jammu And Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात नौदलाचे अधिकरी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी गोळी घातल्यानंतर नरवाल यांना एक स्थानिक एटीव्ही ऑपरेटर इरशाद अहमद यांनी मदत केली होती. ज्याबद्दल माहिती देताना अहमद यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी आपण दाम्पत्याची रुग्णवाहीकेपर्यंत पोहचण्यासाठी मदत करत असताना विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो असे अहमद यांनी सांगितले आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.

या व्हिडीओमध्ये एटीव्ही स्टँडचे अध्यक्ष इरशाद यांनी जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयापर्यंत पोहचवण्याचा त्यांचा अनुभव सांगताना दिसत आहेत. इरशाद यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “आम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता की आम्हाला बाईक्सची आवश्यकता आहे. अचानक मार्केटमध्ये गोंधळ सुरू झाला. आम्ही घाबरलो आणि बाईक घेऊन घरी गेलो. नंतर आम्हाला फोन आला की परिस्थिती सामान्य झाली आहे आणि बचावकार्यासाठी जायचं आहे. त्यानंतर आम्ही सर्व बाईक्स घेऊन बैसरन व्हॅलीकडे निघालो. कारण तेथे कोणतीही गाडी जात नाही, त्यामुळे आम्ही एटीव्ही घेऊन गेलो होतो. दोन दिवसात फोर्स आणि पोलिसांना घेऊन गेलो होतो. तसेच आम्ही तेथून मृतदेह घेऊन आलो. पहिला मृतदेह मी उचलला होता.”

पुढे बोलताना अवघड प्रसंगी त्यांना कशा पद्धतीने नरवाल यांच्या पत्नीला खोटा दिलासा द्यावा लागला याबद्दल त्यांनी भाष्य केलं. विनय यांच्या पत्नीने घाबरून जाऊ नये म्हणून त्यांना खोटं बोलावं लागल्याचं इरशाद यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “नौदल ऑफीसर होते त्यांनाही मीच घेऊन आलो होतो. येताना मी वाटेत थांबलो आणि त्यांची नाडी तपासली, पण त्यांचा मृत्यू झाला होता. तरी मी त्यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी यांना रुग्णालयात घेऊन जाईन. मी रुग्णवाहिकेजवळ गेलो तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”

२२ एप्रिलला नेमकं काय घडलं?

१६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर नौदलातील अधिकारी विनय नरवाल हे त्यांची पत्नी हिमांशी यांच्यासह मधुचंद्रासाठी काश्मीर येथे गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. हिमांशी यांनी सांगितलं की मी माझ्या पतीसह भेळ खात होते. त्यावेळी एक माणूस आला आणि त्याला विचारलं की तू मुस्लिम आहेस का? त्यावर विनय नाही म्हणाला. ज्यानंतर त्या दहशतवाद्याने विनयवर गोळ्या झाडल्या. विनय नरवाल यांनी लग्नासाठी ४० दिवसांची सुट्टी घेतली होती. १६ एप्रिलला विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं. त्यानंतर २० एप्रिलला विमानाने हिमांशी आणि विनय काश्मीरला आले होते. २२ एप्रिल रोजी विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी ठार केलं.