Pahalgam Terror Attack Update : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. जिल्ह्यातील दुडू-बसंतगड भागात गोळीबार सुरू असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. धोकादायक भूप्रदेश आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जाणारा हा परिसर भारतीय लष्कराच्या ९ व्या कॉर्प्सच्या अधिकारक्षेत्रात येतो, तर १६ व्या कॉर्प्सच्या ऑपरेशनल सीमेलाही लागून आहे.

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विशिष्ट गुप्तचर माहितीनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या भागात किमान दोन दहशतवादी लपून बसले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आव्हानात्मक भूप्रदेश आणि घनदाट जंगलात हल्ला होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दल सावधगिरी बाळगत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही चकमक घनदाट जंगलाने व्यापलेल्या उंचावरच्या प्रदेशात होत आहे, हा प्रदेश असंख्य नैसर्गिक गुहा आणि लपण्याची ठिकाणे असलेला आहे, ज्याचा वापर दहशतवादी सुरक्षा दलांपासून लपण्यासाठी अनेकदा करतात.

पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात सलग दोन चकमकी

बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील तंगमार्ग भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली, असे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये जिथे हल्ला झाला, त्या भागाला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असंदेखील म्हटलं जातं. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जात असतात. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या काळात जम्मू-काश्मीरमधील थंड वातावरणात जाण्याला पर्यटकांकडून प्राधान्य दिलं जातं. यंदाही मार्च-एप्रिलमध्ये काश्मीरमधील पर्यटनाच्या व्यवसायाला चांगली सुरुवात झाली होती. पण या हल्ल्यामुळे यंदाचा पर्यटनाचा हंगाम वेळेच्या खूप आधीच बंद झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकांकडून दिली जात आहे.