Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये बुघवारी २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. ५ ते ७ दहशतवाद्यांनी बैसरण खोऱ्यात पर्यटकांवर गोळीबार केला. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद आता उमटू लागले असून भारतानं पाकिस्तानला परखड शब्दांत सुनावलं आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी केली असून भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. पण उत्तराखंडमध्ये भलताच प्रकार समोर आला असून चक्क भारतीय नागरिक असलेल्या काश्मिरी मुस्लिमांनाच निघून जाण्याचे इशारे दिले जात आहेत!
पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून भारतानं पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठीचा व्हिसाही देणं बंद केलं आहे. पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही परत जाण्यास सांगितलं आहे. त्यामुळे एकीकडे पहलगाम हल्ल्यामुळे भारत व पाकिस्तानमधील आधीच प्रचंड ताणले गेलेले संबंध अधिकच चिघळण्याची शक्यता असताना भारतातलं वातावरणही बिघडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
नेमकं घडलं काय?
उत्तराखंडमधला एक व्हिडिओ बुधवारी संध्याकाळपासून व्हायरल होऊ लागला आहे. हिंदू रक्षा दल नावाच्या एका संघटनेच्या ललित शर्मा नावाच्या एका नेत्याने हा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये ललित शर्मा उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या काश्मिरी मुस्लिमांना चक्क तिथून निघून जाण्याचे इशारे देताना दिसत आहे. तसं न केल्यास काश्मिरी मुस्लिमांना अद्दल घडवणार असल्याचंही विधान या व्यक्तीने केलं आहे.
“पहलगाममध्ये झालेल्या घटनेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जर आम्हाला उद्या (२४ एप्रिल) सकाळी १० नंतर एक जरी काश्मिरी मुस्लीम इथे दिसला, तर आम्ही त्याला अद्दल घडवू. उद्या आमचे सर्व कार्यकर्ते काश्मिरी मुस्लिमांना अशी अद्दल घडवण्यासाठी घराबाहेर पडतील. सरकारकडून काही कारवाई होण्याची वाट आम्ही पाहणार नाही. काश्मिरी मुस्लिमांनी सकाळी १० वाजण्याच्या आत उत्तराखंड सोडून जावं, नाहीतर त्यांनी कल्पनाही केली नसेल असे परिणाम त्यांना भोगावे लागतील”, असा थेट इशारा ललित शर्मा व्हिडीओत देताना दिसत आहे.
काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये घबराट
दरम्यान, ललित शर्माच्या या व्हिडीओनंतर उत्तराखंडमध्ये शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. “आज १५ विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. आम्ही परीक्षेसाठी महाविद्यालयात आलो आहे. पण विद्यार्थ्यांना उजव्या विचारसरणीच्या गटांकडून धमक्या दिल्या जात आहेत”, अशी माहिती डून पीजी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली.
यासंदर्भात जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटनेच्या नासिर खुएहामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उत्तराखंडमधील उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांकडून धमक्या दिल्या जात आहेत. सकाळी १० वाजेच्या आत उत्तराखंड सोडून जाण्यास सांगितलं जात आहे. याला घाबरून अनेक विद्यार्थी विमानतळाच्या दिशेनं निघून गेले आहेत. आम्ही राज्यपालांशी व पोलिसांशी बोललो आहोत. तसेच, आम्ही तिथल्या विद्यार्थ्यांच्याही संपर्कात आहोत”, असं ते म्हणाले.
पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई?
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. “काश्मिरी विद्यार्थी जिथे शिकतात, तिथले डीन व वॉर्डन यांच्या संपर्कात आम्ही आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सुरक्षेची हमी दिलेली आहे. जर कुणीही कायद्याविरोधात काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याविरोधात आम्ही कठोर कारवाई करू”, असं डेहराडूनचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितलं आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडीओवर मात्र बोलण्याचं त्यांनी टाळलं.