India Takes on Pakistan in UN: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून जगभरात पाकिस्तानला लक्ष्य केलं जात आहे. भारतातून या हल्ल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी भारतीयांकडून केली जात आहे. काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय तपास पथकांनी दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. सीमेवरदेखील वातावरण तणावपूर्ण झालं असून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावलं आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी व्हिक्टिम्स ऑफ टेररिजम असोसिएशन नेटवर्क अर्थात VoTAN या संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमासंदर्भातील बैठकीत पाकिस्तानला फैलावर घेतलं. “एका देशाच्या शिष्टमंडळानं या व्यासपीठाचा गैरवापर भारताविरुद्ध निराधार आरोप करून अपप्रचार पसरवण्यासाठी करणं हे दुर्दैवी आहे”, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर तोफ डागली.
पहलगाम हल्ल्यासंदर्भात भाष्य
योजना पटेल यांनी यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकत्याच केलेल्या एका जाहीर विधानाचा संदर्भ घेत पाकिस्तानला सुनावलं. “पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देण्याचा पाकिस्तानचा इतिहास राहिला आहे’, असं जाहीर मुलाखतीमध्ये मान्य केलं आहे. ख्वाजा आसिफ यांची ही जाहीर कबुली ऐकून कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. यातून पाकिस्तान जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि भारतीय उपखंडात अस्थैर्य निर्माण करणारा देश सिद्ध झाला आहे. जग याकडे आता दुर्लक्ष करू शकत नाही”, असं योजना पटेल म्हणाल्या.
जगभरातल्या देशांचे मानले आभार
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा देणाऱ्या जगभरातल्या देशांचे यावेळी योजना पटेल यांनी आभार मानले. “आंतरराष्ट्रीय समुदायाची दहशतवादासंदर्भातली कठोर भूमिका यातून स्पष्ट होतेय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर सर्वाधिक संख्येनं सामान्य नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बळी ठरला आहे. त्यामुळे अशा कारवायांनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर व समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांची भारताला पूर्ण कल्पना आहे”, असंही योजना पटेल यांनी नमूद केलं.
“संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दहशतवादी, अशा कारवायांचे नियोजनकर्ते, या कारवायांना आर्थिक मदत करणारे आणि अशा कारवायांचे कर्तेधर्ते यांना दोषी मानून त्यांना शासन व्हायला हवं. दहशतवादी कृत्ये ही गुन्हेगारी स्वरूपाची व असमर्थनीय असतात. मग त्यामागे त्यांचा उद्देश काहीही असो किंवा ती कधीही, कुठेही आणि कुणीही केलेली असोत”, असंही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.