Indians Protest at Pakistan High Commission in London : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. तर, काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याविरोधात देशाच्या वेगवेगळ्या भागातील लोक रस्त्यावर उतरलेले असताना लंडनच्या रस्त्यांवरही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळाली. लंडनमधील भारतीय नागरिकांनी येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर (Pakistan High Commission in London) आंदोलन केलं. या आंदोलनाचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर जमलेल्या भारतीय नागरिकांनी तिथल्या पाकिस्तानी नागरिकांना, दूतावासातील कर्मचाऱ्यांना तुमचं पाणी बंद होणार आहे, तुम्हाला आता प्यायला आणि इतर गोष्टींसाठी पाणी मिळणार नाही, नो वॉटर-नो चाय अशा आशयाच्या घोषणा दिल्या, तसेच पोस्टर्स झळकावले. दरम्यान, आंदोलनावेळी एक आजोबा पाकिस्तानी नागरिकांना खिजवत असतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने देखील शेअर केला असून त्यांनी या आजोबांना हिरो म्हटलं आहे.

सगळेच हिरो कॅप परिधान करत नाहीत : भाजपा

कर्नाटक भाजपाने या आजोबांचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की “सगळेच हिरो कॅप परिधान करत नाहीत. काही लोकांच्या एका हातात केवळ पाण्याची बाटली असते अन् दुसऱ्या हातात पाकिस्तानचं भविष्य असतं”. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने बनवलेल्या बनावट एक्स खात्यावरून या आजोबांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये म्हटलं आहे की या माणसाने एकट्यानेच ५७ देशांना मागे टाकलं आहे.

हे आजोबा पाकिस्तानी नागरिकांना व दूतावासातील कर्मचाऱ्यांना पाण्याची बाटली दाखवून खिजवत आहेत. “भारताने पाकिस्तानचं पाणी अडवलं आहे. आता तुम्ही एकेका थेंबासाठी अक्षरशः भिक मागाल”, असं ते म्हणत होते. दुसऱ्या बाजूला दूतावासाबाहेर जमलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी देखील भारतविरोधी घोषणाबाजी केली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून स्थिती त्यांच्या नियंत्रणात आणली.

london Protest
कर्नाटक भाजपाने शेअर केलेला फोटो

भारताकडून सिंधू जलकरारास स्थगिती

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारताने सिंधू जलकराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली की भारत आता सिंधू नदीचं पाणी अडवेल, ज्यामुळे पाकिस्तान पाण्याच्या एकेका थेंबासाठी तरसेल. हाच धागा पकडून लंडनमधील या आजोबांनी पाकिस्तानी नागरिकांना खिजवण्याचा प्रयत्न केला.