Pahalgam Terror Attack Security Beefed Up in Jammu : काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केलं आहे. पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यामध्ये डोंबिवलीचे तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे.

या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.

दहशतवादाविरोधात अनेक संघटना आज रस्त्यावर उतरणार

तसेच या हल्ल्यानंतर जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी जम्मू व काश्मीरमधील अनेक संघटनांनी निदर्शने करण्य्याचं आवाहन केलं आहे. काही ठिकाणी काल कॅण्डल मार्च काढण्यात आले. आजही काही ठिकाणी कॅण्डल मार्च काढले जाणार आहेत. त्यामुळे जम्मूमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला मानला जात आहे.

सुरक्षेसाठी जम्मूमध्ये उच्चस्तरीय बैठक

जम्मू-काश्मीर काँग्रेसने व अनेक स्थानिक संघटनांनी बुधवारी जम्मू शहर व इतर ठिकाणी निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. ही स्थिती सांभाळण्यासाठी, त्यासाठी रणनिती आखण्यासाठी जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार व जम्मूचे पोलीस महानिरीक्षक भीमसेन तुती यांनी संयुक्तरित्या प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या संघटना रस्त्यावर उतरणार

जम्मूच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं की जम्मूमध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस व निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने जम्मू शहरात लाँग मार्च काढण्याचं ठरवलं आहे. याच्या तयारीसाठी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना बुधवारी सकाळी पक्ष मुख्यालयात बोलावलं आहे. यासह शिवसेना (ठाकरे), डोगरा फ्रंट व राष्ट्रीय बजरंग दलासह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वकिलांची संघटना आणि बाजार समित्यांमधील लोक या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.