Pahalgam Terror Attack Maharashtra government to Provide assistance : काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळख असलेल्या बैसरन येथे मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष्य केलं. दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. तर जखमी पर्यटकांपैकी चार जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. मृत पर्यटकांच्या कुटुबींयांना व जखमींना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये, तर जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच श्रीनगरसह काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणलं जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत

फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण सहा जणांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमध्ये जे महाराष्ट्रातील पर्यटक अडकले आहेत त्यांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल.”

फडणवीस यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “डोंबिवलीतील तीन पर्यटकांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर येणार असून दोन पार्थिव पुण्यात येणार आहेत. मुंबईत आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा विमानतळावरील व्यवस्था पाहत आहेत. तर, पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ व माधुरी मिसाळ समन्वय साधतील.

“आम्हाला न्याय हवाय”, मृतांच्या नातेवाईकांचा अमित शाहांपुढे टाहो

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही वेळापूर्वी पहलगाम येथे पोहचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन केलं. यावेळी अमित शाहांना पाहून मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासमोर टाहो फोडला. “आम्हाला न्याय हवाय” असं म्हणत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर शाह म्हणाले, मृतांच्या कुटुंबीयांना झालेलं दुःख हे शब्दांत मांडता येणार नाही, मी शब्द देतो ज्यांनी निष्पाप जीव घेतले त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही.