Pahalgam Terror Attack on security breach in Kashmir : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकार अ‍ॅक्शन मोडवर आहे. दहशतवादी संघटनांविरोधात, त्यांना सहाय्य करणाऱ्या आपल्या शत्रूराष्ट्रांवरील कारवाई व पहलगाम हल्ल्यानंतरच्या भारताच्या पुढील कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी सरकारच्या दहशतवादाविरोधातील सर्व प्रकारच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. तसेच पुढील कारवायांना पाठिंबा दिला आहे. तसेच आपण एकजूट आहोत हे दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेचं सर्वात मोठं अपयश असल्याचं विरोधकांनी नमूद केलं. विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण व गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींवरून सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना सरकारने सांगितलं नेमकी चूक कुठे झाली.

सुरक्षा यंत्रणेला बैसरन पर्यटकांसाठी खुलं केल्याची माहितीच नव्हती

आपचे माजी खासदार संजय सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की “सरकारने आम्हाला या हल्ल्याची माहिती देताना सांगितलं की ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो भाग म्हणजेच बैसरण (मिनी स्वित्झर्लँड) हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी अमरनाथ यांत्रेदरम्यान खुलं केलं जातं. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवली जाते. तिथे प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असतात. मात्र, यावेळी बैसरन २० एप्रिलपासून खुलं करण्यात आलं होतं. मात्र, याबद्दल सुरक्षा यंत्रणेला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नव्हती. २० एप्रिलपासून हे ठिकाण कुठल्याही सुरक्षेशिवाय पर्यटकांसाठी खुलं झालं होतं. सुरक्षा व्यवस्थेतील ही एक मोठी चूक होती. जी आमच्या निदर्शनास आली आहे.

स्थानिक प्रशासनाची डोळेझाक भोवली

पर्यटन कंपन्यांनी २० एप्रिलपासूनच पर्यटकांना बैसरनला नेण्यास सुरुवात केली होती. स्थानिक प्रशासनाने देखील संरक्षण यंत्रणेला याची माहिती दिली नाही. तसेच स्थानिक पोलीस ठाण्याने देखील याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे बैसरनमध्ये सुरक्षारक्षक नव्हते. परिणामी दहशतवाद्यांनी या संधीचा गैरफायदा घेत थेट पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटक मृत्यूमुखी पडले असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमधील सहा जण मूळचे महाराष्ट्रातील रहिवासी होते.