Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांमध्ये बहुतेक जण हे पर्यटक आहेत. या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) कडे देण्यात आली आहे. यादरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. न्यूज१८ ने देलेल्या वृत्तानुसार, बैसरन येथे पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडीओग्राफर हा एनआयएसाठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आला आहे. या संपूर्ण व्हिडीओग्राफरने दहशतवादी हल्ल्याचा व्हिडीओ चित्रित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

नेमकं काय झालं?

“हा स्थानिक फोटोग्राफर गोळीबार सुरू झाल्यानंतर स्वत:चा जीव वाचवून पळाला आणि गोळीबारापासून बचावासाठी एका झाडावर चढून बसला. पण तो घटना घडत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत राहिला आणि त्याने संपूर्ण दहशतवादी हल्ल्याचे रेकॉर्डिंग केले,” असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितल्याचे वृत्त सीएनएन-न्यूज१८ने दिले आहे.

एनआयने या व्हिडीओग्राफरची चौकशी केली असून त्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओच्या विश्लेषनातून दहशतवाद्यांची आणि त्यांना मदत करणाऱ्या संभाव्य ओव्हरग्राउंड वर्कर्सची ओळख पटवली जात आहे.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चार दहशतवादी हे दोन गटांमध्ये विभागले गेले होते आणि त्यांनी दोन बाजूंनी गोळीबार सुरू केला. “अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या मागे लपलेले दोन दहशतवादी समोर आले. त्यांनी पहिल्यांदा बाहेरून आलेल्या लोकांना त्यांचा धर्म विचारला. काही जणांना कलमा म्हणायला सांगितले, जे म्हणू शकले नाहीत त्यांना ठार केले,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरुवातीला संशय व्यक्त केला गेला होता त्याप्रमाणे हा अंदाधुंद गोळीबार नव्हता असे एनआयएचा म्हणणे आहे. दहशतवाद्यांनी ठरवून पर्यटकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या असे एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरूवातीला दोन दहशतवाद्यांनी चार पर्यटकांच्या डोक्यात गोळी घातल्यानंतर गोंधळ सुरू झाला असे बचावलेल्या पर्यटकाने सांगितले. त्यानंतर इतर दोन दहशतवादी समोर आले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या लोकांच्या गर्दीवर गोळीबार सुरू केला.

आतापर्यंत कोणती माहिती समोर आली आहे?

तसेच दहशतवादी एका पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा फोनही गेऊन गेल्याचे सांगितले जात आहे. यंत्रणांकडून हे दोन्ही फोन ट्रॅक केले जात आहेत. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्याच्या दिवसापासून हे फोन बंद करण्यात आले आहेत.

एनआयएने एके-४७ आणि एम४ रायफल्सची रिकामी काडतुसे देखील जप्त केली आहेत. “अफगाणिस्तान युद्ध संपल्यापासून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून एम४ चा वापर केला जात आहे, जो यामागे कोण आहे हे दाखवून देणारा पुरावा आहे,” असे गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की चार दहशतवाद्यांपैकी किमान एक आदिल ठोकर हा स्थानिक होता. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनुसार, २०१८ साली ठोकर हा हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामील झाला होता. तो वैध कागदपत्रे घेऊन पाकिस्तानात गेला आणि पुढे हिजबुल मुजाहिदीन सोडून लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर तो २०२४ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधअये परतल्याचे वृत्त आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pahalgam terror attack nia key witness local reels videographer recorded entire baisaran attack rak