Pahalgam Terror Attack : एका महिलेने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांची हत्या करणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांकडून जम्मू आणि काश्मीरमधील कठुआमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली . जम्मू आणि काश्मीरच्या स्पेशन ऑपरेशन ग्रुप घटनास्थळावर दाखल झाला असून कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
यादरम्यान पुलवामाच्या बारामुल्ला येथे देखील शोध आणि कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होते. बारामुल्लाच्या पट्टण भागात बंदी असलेल्या जम्मू अँड काश्मीर नॅशनल फ्रंट (जेकेएनएफ) संघटनेशी संबंधित ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
बेकायदेशीर कारवायांना आळा घालणे आणि दहशतवाद्यांच्या परिसंस्था उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने बारामुल्ला पोलिसांनी गुलाम मोहम्मद गनाई याच्या पट्टण येथील घरी शुक्रवारी छापेमारी केली. या ठिकाणी आढळून आलेल्या वस्तू तसेच चौकशी सुरू असलेल्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे पुरावा म्हणून जप्त करण्यात आली आहेत. तसेच पुढील कायदेशीर कारवाई केली जात असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे .
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी २६ जणांना ठार मारल्याची घटना घडली. गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित दहशतवादी गट , रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव
या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरातल्या देशांकडून पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. त्यात पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी करण्याबरोबरच भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला संपूर्णतः आळा घालत नाही तोपर्यंत भारताकडून १९६० साली अस्तित्त्वात आलेल्या सिंधू जलवाटप कराराचे (इंडस वॉटर ट्रीटी) पालन यापुढे केले जाणार नाही, असे भारत सरकारकडून २३ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात आले. गेल्या ६० वर्षांच्या कालखंडात हे प्रथमच घडत आहे.