Pahalgam Terror Attack Sharad Pawar : कोकण दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय व सामाजिक विषयांवर टिप्पणी केली. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “दहशतवादाविरोधात सरकार ज्या कारवाया करेल त्यात आमचं (विरोधी पक्ष) त्यांना पूर्ण सहकार्य असेल.” दरम्यान, शरद पवारांनी पहलगाममधील सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवलं. यासह ते म्हणाले की “काश्मीरमधील दहशतवाद संपल्याचा निष्कर्ष काढला जात होता, मात्र आता आपण सावथ राहायला हवं.”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, “काश्मीरमध्ये जे काही झालं आहे त्यानंतर देशातील सर्व जनतेने, राजकीय पक्षांनी एका विचाराने सरकारबरोबर असायला हवं. इथे राजकारण आणायचं नाही. सरकार अतिरेक्यांविरोधात जी काही कारवाई करेल त्यात आपण सरकारबरोबर असायला हवं. यासंदर्भात केंद्र सरकारने नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. आमच्या पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे या सर्वपक्षीय बैठकीला हजर होत्या. यावेळी सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं आहे.
आमचं सरकारला पूर्ण सहकार्य असेल : शरद पवार
शरद पवार म्हणाले, “सर्व पक्षांनी सहकार्याची भूमिका घेतल्याचं पाहून मला आनंद झाला परंतु, आमची एकच विनंती आहे की सरकारने देखील हे प्रकरण अधिक गांभीर्याने पाहावं आणि सुरक्षेतील कमतरता दूर करावी. सरकार त्यांच्या कमतरता मान्य करत असेल तर त्या दूर करणं, त्यासाठी तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. या सगळ्या कामात आम्हा लोकांचं सरकारला पूर्ण सहकार्य राहील.”
शरद पवारांकडून सरकारची कानउघडणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रमुख म्हणाले, केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवलं आणि त्यानंतर त्यांनी दहशतवादाविरोधात यश मिळवल्याचा दावा केला. दहशतवादाविरोधात यश संपादन केल्याचा निष्कर्ष काढला जातोय. मात्र, पहलगामसारख्या घटना पाहून वाटतं की सरकारने सावध राहायला हवं, काळजी घ्यायला हवी.
शरद पवार म्हणाले, “अतिरेक्यांनी केवळ पुरुषांनाच गोळ्या घातल्या. स्त्रियांना सोडून दिलं. पहलगाममध्ये पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्या भगिनिंनी मला सांगितलं की अतिरेक्यांनी आमच्या घरातील केवळ पुरुषंना मारलं, आमच्यापैकी कोणाला हात लावला नाही.”