Pahalgam Terror Attack Militants Photo & Sketch released : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा सातत्याने केंद्र सरकार व स्थानिक प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. दहशतवाद्यांनी मंगळवारी बैसरण खोऱ्यात थेट पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष्य केलं आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दरम्यान, पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो समोर आला आहे. हा त्याचा पाठमोरा फोटो असून त्याच्या हातात एके-४७ ही मशीन गन आहे. त्याने कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. भारतीय लष्कर व इतर तपास यंत्रणा त्याच्यासह त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की काही हल्लेखोरांनी भारतीय लष्करी जवानांसारखा गणवेश परिधान केला होता. हल्ला केल्यानंतर ते काश्मीर खोऱ्यातच लपून बसले असावेत असा प्राथमिक अंदाज असून तपास यंत्रणांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली आहे.
हल्लेखोरांची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात
भारताची गुप्तचर यंत्रणा देखील अलर्टवर असून ते या दहशतवाद्यांची माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे. दहशतवादी याच दुचाकीवरून बैसरन येथे आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तीन संशयितांचे स्केच प्रशासनाकडून जारी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांची नावं आणि स्केच संरक्षण यंत्रणेने जारी केले आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी या तिघांची नावं असून लष्करातील जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जखमी पर्यटकाने सांगितली आपबिती
गुजरातचे रहिवासी असलेले विनय बै हे काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या हाताला गोळी लागली असून त्यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत. बै म्हणाले, मंगळवारी दुपारी मी या परिसरात प्रवेश करणार इतक्यात मला गोळीबाराचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. लोक जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते. मी देखील तिथून निसटण्याचा प्रयत्न करत होतो. मी सुद्धा धावू लागलो. मात्र अचानक एक गोळी कुठूनतरी आली आणि माझ्या हाताच्या कोपरात शिरली.”