Pahalgam Terror Attack Survivors: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या आसाम विद्यापीठातील एका प्राध्यापकाने सांगितले की, त्यांनी कलमा म्हटल्यामुळे त्यांना दहशतवाद्यांनी जीवंत सोडले. लष्कर-ए-तैयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांनी ज्या पर्यटकांवर हल्ला केला त्यामध्ये आसाम विद्यापीठातील बंगाली भाषा विभागाचे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचाही समावेश होता. या हल्ल्यात किमान २६ लोक मृत्युमुखी पडले आहेत, ज्यात बहुतेक पर्यटक होते. दरम्यान या हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे.
प्राध्यापकांनी सांगितले की, त्यांच्या शेजारी झाडाखाली लपलेल्या लोकांचा आवाज ऐकून त्यांनीही कलमा म्हणायला सुरुवात केली. “सहजपणे, मीही ते म्हणायला सुरुवात केली. काही क्षणांनंतर, एक दहशतवादी आमच्याकडे आला आणि माझ्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली,” असे देबाशिष भट्टाचार्य यांनी सांगितले. याबाबत न्यूज १८ आसामने वृत्त दिले आहे.
भयानक क्षण आठवत देबाशिष भट्टाचार्य पुढे म्हणाले की, “त्याने माझ्याकडे सरळ पाहिले आणि विचारले, ‘क्या कर रहे हो?’ यानंतर मी आणखी जोरात कलमा म्हणायला सुरुवात केली. मला माहित नाही की, मी असे का केले. पण काही कळाले नाही, तो मागे हटला आणि निघून गेला. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी जिवंत आहे.”
भट्टाचार्य म्हणाले की, वाटेवर घोड्यांच्या खुरांच्या खुणा पाहून ते जवळजवळ दोन तास धावत होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने एका घोडेस्वाराच्या मदतीने हॉटेल गाठले, असे न्यूज १८ आसामच्या वृत्तात म्हटले आहे.
दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफ चा हात
दरम्यान या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) स्वीकारली आहे. टीआरएफ ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची शाखा आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये ‘कलम ३७०’ रद्द केला आणि भारत सरकारने जम्मू व काश्मीरचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द करून, दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. त्यानंतर टीआरएफ हा गट अस्तित्वात आला. तोपर्यंत काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा व जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. रेझिस्टन्स फ्रंटच्या नेतृत्वात साजिद जट्ट, सज्जाद गुल व सलीम रहमानी यांचा समावेश आहे. हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत.