जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांनाच लक्ष्य केल्याने जम्मू काश्मीरला जाण्याचं नियोजन करणाऱ्या लोकांनी त्यांच्या टूर रद्द केल्या आहेत. याकरता ट्रॅव्हल एजंटना हॉटेल्स आणि फ्लाईट बुकिंग रद्द करण्यासाठी सातत्याने फोन येत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
कॅनॉट प्लेसमधून स्कायलिंक प्रायव्हेट लिमिटेड चालवणारे आशिष शर्मा म्हणाले, पुढील १० दिवसांसाठी नियोजित सर्व टूर रद्द करण्यात आले आहेत. उत्तरेकडील राज्ये, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून या काळात बुकिंग होतात. अशा हल्ल्यामुळे नागरिक घाबरले आहेत. त्या सर्वांनी फोन करून त्यांचे हॉटेल आणि इतर बुकिंग रद्द केले आहेत.”
पुढच्या आठवड्यातील ३० टूर रद्द
“ज्या लोकांनी रस्तेमार्गे प्रवास करण्याची योजना आखली होती त्यांनीही त्यांचा प्रवासाचा बेत रद्द केला आहे. विमानाने जाणारे काही लोक तिकिटे रद्द करण्यासाठी फोन करत होते, तर काही जण ऑनलाइन रद्द करण्याचा प्रयत्न करत असतील”, शर्मा पुढे म्हणाले. गेल्या आठवड्यात त्यांनी जवळपास २० टूर आयोजित केले होते. पुढचा आठवडा चांगला जाणार होता कारण सुमारे ३० टूर आयोजित केले होते, पण या टूर आता रद्द झाल्या आहेत.”
“उद्या नियोजित १० टूरपैकी सात टूर आधीच रद्द करण्यात आले आहेत,” असे हँगआउट हॉलिडेज काश्मीर चालवणारे ३६ वर्षीय फुरकान बशीर म्हणाले. “एप्रिलमध्ये नियोजित जवळजवळ सर्व टूर रद्द करण्यात आले आहेत. प्रत्येकजण त्यांचे बुकिंग रद्द करण्यासाठी फोन करत आहे”, बशीर म्हणाले. या एजन्सीकडे देशभरातून बुकिंग येत असते.
आता पर्यटकांचा ओघ कमी होईल
“उद्या सकाळी श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम येथे नऊ जणांचा दौरा होता. हल्ल्याची बातमी येताच त्यांनी फोन करून त्यांची सहल रद्द केली. जूनपर्यंत आमच्याकडे बुकिंग केलेल्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत”, असे मालवीय नगर येथील काश्मीर-विशिष्ट ट्रॅव्हल एजन्सीचे मालक म्हणाले. “आमच्यासाठी मे आणि जूनचा पहिला आठवडा हा सर्वात व्यस्त काळ असतो. गेल्या चार वर्षांत, काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. आता खूप भीतीचे वातावरण आहे. मला वाटत नाही की यावर्षी आमच्याकडे जास्त पर्यटक असतील”, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.