Pahalgam Terror Attack Tourist Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांना लक्ष्य केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जण ठार झाले आणि काही जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारतासह परदेशातील पर्यटकांनाही त्यांच्या सहली रद्द कराव्या लागल्या आहे. या हल्ल्यामुळे पर्यटकांनी हॉटेल बुकिंग रद्द आणि जम्मू आणि काश्मीरमधील नियोजीत सुट्टी रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका व्हिडिओमधये पर्यटकांचा एक गट पहलगामला जाण्याचे त्यांचे नियोजन रद्द करत दिल्लीला परतत असल्याचे दिसत आहे.
सुरक्षा महत्त्वाची
दिल्लीतील पर्यटकांपैकी एक असलेल्या समीर भारद्वाज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या कुटुंबाने पहलगामला जाण्याचा निर्णय कसा रद्द केला याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले “आम्ही गेल्या तीन दिवसांपासून येथे आहोत. पहलगामला भेट देण्याची आमची योजना होती, पण परिस्थिती बिघडल्याने आम्ही दिल्लीला परत जात आहोत. सुरक्षा महत्त्वाची आहे, आम्ही काही काळानंतर पुन्हा पर्यटनासाठी येऊ शकतो.”
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्याने, अनेकांनी त्यांचा नियोजित जम्मू काश्मीर दौरा रद्द केला असून, याकरता ट्रॅव्हल एजंट्सना हॉटेल्स आणि फ्लाईट बुकिंग रद्द करण्यासाठी सातत्याने फोन येत आहेत.
पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
कॅनॉट प्लेसमधून स्कायलिंक प्रायव्हेट लिमिटेड चालवणारे आशिष शर्मा म्हणाले, “पुढील १० दिवसांसाठी नियोजित सर्व टूर रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तरेकडील राज्ये, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून या काळात बुकिंग होतात. अशा हल्ल्यामुळे नागरिक घाबरले आहेत. त्या सर्वांनी फोन करून त्यांचे हॉटेल आणि इतर बुकिंग रद्द केले आहेत.” इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
“ज्या लोकांनी रस्त्याच्या मार्गाने प्रवास करण्याची योजना आखली होती त्यांनीही त्यांचा प्रवासाचा बेत रद्द केला आहे. विमानाने जाणारे काही लोक तिकिटे रद्द करण्यासाठी फोन करत आहेत, तर काहीजण त्यांची तिकिटे ऑनलाइन रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे शर्मा यांनी पुढे सांगितले.
पर्यटकांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला
जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधीही काश्मीर खोऱ्यात पर्यटकांना लक्ष्य करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये २००० सालापासून २०२४ पर्यंत सहा वेळा पर्यटकांवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये सुमारे १५० पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.