Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले आहेत. महाराष्ट्रातल्या सहा जणांचा या २६ जणांमध्ये समावेश आहे. भारतातलं काश्मीर हे ठिकाण पर्यटकांसाठी ओळखलं जातं. मात्र याच पर्यटकांच्या रक्ताचे सडे मंगळवारी काश्मीरच्या बर्फात पडल्याचं पाहण्यास मिळालं. संपूर्ण देशाने या घटनेबाबत चिड आणि हळहळ व्यक्त केली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम या ठिकाणी पोहचले आहेत. त्यांनी या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं.

अमित शाह पहलगाम दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाममध्ये पोहचले आहेत. त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. भारत दहशतवादापुढे मुळीच झुकणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं. ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला, त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही असंही अमित शाह म्हणाले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना झालेलं दुःख हे शब्दांत मांडता येणार नाही, मी शब्द देतो ज्यांनी निष्पाप जीव घेतले त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही असंही अमित शाह म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी या घटनेत ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवांजवळ जाऊन आदरांजली वाहिली. जम्मू आणि काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाखांची आणि किरकोळ जखमी झालेल्यांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या दोन दिवसांत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक घेऊ शकतात.

काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केलं आहे. पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. 

TRF ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ही जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी संघटना आहे. २०२३ साली भारत सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. या संघटनेची स्थापना भारतात झालेली असली तरी पाकिस्तानच्या लष्कर ए तैय्यबची शाखा असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. अलीकडच्या हल्ल्याशिवाय ही संघटना अनेक काश्मिरी हिंदूंच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या, स्थानिक पोलिसांच्या आणि व्यावसायिकांच्या हत्येलाही कारणीभूत आहे. जिहादी गट लष्कर-ए-तैय्यब आणि हिजबुल मुजाहिद्दीनमधील कॅडरचा वापर करून २०१९ मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली होती. याच संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.