Pahalgam Terror Attack video: काश्मीर खोऱ्यात पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या नागरिकांना अचानक घेरून दहशतवाद्यांनी अमानुषपणे जीव घेतले. पहलगामच्या बैसरन घाटीत सोमवारची संध्याकाळ अचानक दहशतीत बदलली. पर्यटक मिनी स्वीत्झर्लंडमधून बाहेर येताच २० फूट अंतरावरून गोळीबार सुरू झाला. तब्बल २६ पर्यटकांचा यात मृत्यू झाला. या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये काही तरुणांनी लांबूनच दहशदवाद्यांचा हल्ला पाहिला आणि त्याठिकाणाहून पळ काढला नाहीतर त्यांच्यावरही गोळीबार केला असता. यावेळी त्यांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये घटनेची माहिती दिली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या भारत प्रशासित प्रदेशातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन कुरणात चार अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या गटाने पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. यावेळी हा हल्ला तिथे असलेल्या काही तरुणांनी पाहिला, मात्र सुदैवानं ते लांब असल्यानं त्यांना तिथून पळून जाता आलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे तरुण देखील घाबरलेले असून चला इथून चला इथून असा आवाज येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या हल्ल्याचा अंदाज येईल.
वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!
या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला. “तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”, असं एका महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं.
पाहा व्हिडीओ
लष्कराने हाती घेतली शोध मोहीम
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम हाती घेतली आहे. या घटनेनंतर एनआयएचे पथकही श्रीनगरला पोहोचले आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने होते. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहे.