Pahalgam Terror Plot : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता अनेक व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. पिकनिकसाठी गेलेल्या अनेक पर्यटकांचा यात जीव गेल्याने देशभर हळहळ व्यक्त केली गेली. दरम्यान, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असून या चौकशीतूनही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
या घटनेतील प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहेत. आतापर्यंत २५ जणांची चौकशी केली असून त्यांनी दहशतवादी कुठून आले, त्यांनी कसा गोळीबार केला याविषयी माहिती दिली. दोन दहशतवादी बैसरन खोऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आले, तर एकजण बाहेर पडण्याच्या गेटवर तैनात करण्यात आला होता. तर चौथा दहशतवादी जंगलात लपला असावा. प्रामुख्याने तीन दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांवर गोळीबार केला, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिले आहे. दोन दहशतवादी लष्करी पोशाखात होते, तर तिसरा पारंपारिक काश्मिरी फेरन परिधान केलेला होता, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
दहशतवाद्यांच्या मागणीला पर्यटकांचा नकार
बाहेर पडण्याच्या गेटवर सुरुवातीला गोळीबार झाला. त्यामुळे पर्यटक मुख्य प्रवेशद्वाराकडे धावत गेले. परंतु, तिथेही आधीच दोन दहशतवादी हातात बंदुका घेऊन उभे होते. प्रवेशद्वारावर, दहशतवाद्यांनी सर्वांना एकत्र केले आणि महिलांना पुरुषांपासून वेगळे होण्यास सांगितले. परंतु, लोकांनी नकार दिला. नंतर दहशतवाद्यांनी हिंदूंना मुस्लिमांपासून वेगळे होण्यास सांगितले. तेव्हाही पर्यटकांनी नकार दिला, असंही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं असल्याचं वृत्तात नमूद आहे.
चहाची टपरी आणि भेळपुरी स्टॉलवर सर्वाधिक जीवितहानी
त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळीबार करण्यापूर्वी कलमा म्हणण्यास सांगितले. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्यावर सर्वांत पहिली गोळी चालवली गेली. ते प्रवेशद्वाराच्या येथे उभे होते. चहाच्या टपरी आणि भेळपुरी स्टॉल परिसरात सर्वाधिक जीवितहानी झाली कारण तिथे अनेक लोक जमले होते. हल्ल्यानंतर, दहशतवादी उद्यानाच्या डाव्या बाजूला भिंतीवरून उडी मारून पळून गेले, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमधील ५० पर्यटन स्थळे बंद
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू-काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागातील तब्बल ५० पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.