Pahalgam Terror Attack Updates Today: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमधली परिस्थिती पूर्ववत झाल्याचे दावे सरकार व प्रशासनाकडून करण्यात येत होते. पण पहलगामच्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये निरपराध पर्यटकांचे जीव गेल्यानंतर हे दावे फोल ठरल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध केला जात आहे. हल्ला झाला, तेव्हा नेमकं या भागात काय घडलं, याचं प्रत्यक्षदर्शींनी केलेलं थरारक कथन आता समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
मंगळवारचा दिवस जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यामध्ये नेहमीसारखाच सुरू झाला. या भागातील निसर्गरम्य परिसरात पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली. दुपारच्या सुमारास या भागात जवळपास एक ते दीड हजार पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. हे प्रमाण तसं नेहमीपेक्षा काहीसं कमीच होतं. पण दिवस जसजसा वर सरकू लागला, तसतशी पर्यटकांची संख्याही वाढू लागली. पण पर्यटकांबरोबरच इथे दहशतवादीही दाखल झाल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही!
“एक गोळी अचानक कुठूनतरी माझ्या हाताच्या कोपऱ्याला लागली”
गुजरातचे रहिवासी विनय बै हे बैसरणमध्ये फिरण्यासाठी आले होते. मंगळवारी दुपारी ते या भागात प्रवेश करणार इतक्यात त्यांना गोळीबाराचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. “मी बैसरणमध्ये शिरणात इतक्यात गोळ्यांचा आवाज यायला लागला. लोक जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. मी तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असतानाच एक गोळी कुठूनतरी आली आणि माझ्या हाताच्या कोपरात शिरली”, असं बै यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं.
वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!
या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला. “तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”, असं एका महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं.
जे पर्यटक तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, तेही दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या अंदाधुंद गोळीबारात मरण पावले. “हल्ल्यातून वाचलेल्या एका पर्यटकानं आम्हाला सांगितलं की गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर ते सगळे नजीकच्या तंबूंच्या दिशेनं पळाले. पण काही वेळातच दहशतवादी त्या तंबूंपर्यंत पोहोचले. बाजूच्याच तंबूत शिरून त्यांनी सर्व पुरुषांना बाहेर यायला सांगितलं. त्यांच्याशी दहशतवादी काहीतरी बोलले आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या”, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.
“२० मिनिटं दहशतवादी बंदुका घेऊन फिरत होते”
दरम्यान, दहशतवाद्यांचा गोळीबार तब्बल २० मिनिटांसाठी सुरू होता, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी पर्यटकानं दिल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. “गोळीबार चालू असताना असं वाटत होतं की तो हल्ला कधी संपणारच नाही. ते सगळे दहशतवादी तिथे जवळपास २० मिनिटं होते. त्यांना कुणीही निर्बंध घालणारं नव्हतं. ते सगळीकडे फिरत होते आणि गोळ्या झाडत होते”, असं त्यांनी सांगितलं.
“पोलीस येईपर्यंत दहशतवादी निघून गेले होते”
बैसरण खोऱ्याचं ठिकाण हे पहलगामपासून जवळपास साडेसहा किलोमीटर आहे. पण तिथपर्यंत एकतर पायी किंवा घोड्यांवरच पोहोचता येऊ शकतं. कारण यातला सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलाचा आणि ओबडधोबड आहे. त्यामुळे पर्यटकांना घटनास्थळापासून बाहेर नेण्यासाठी कोणतंही वाहन तिथे उपलब्ध नव्हतं. काही दुकानदार व टुरीस्ट गाईड्सनी जखमी पर्यटकांना घोड्यांवरून पहलगामच्या दिशेनं नेण्यासाठी मदत केली. “पोलीस घटनास्थळी दाखल व्हायच्या खूप आधीच दहशतवादी निघूनही गेले होते”, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी पर्यटकानं दिली.
“आम्हाला वाटलं लष्कराचा नियमित सराव असेल”
दरम्यान, मूळच्या कर्नाटकच्या असणाऱ्या पल्लवी राव यांनी सुरुवातीला हा गोळीबार म्हणजे लष्कराचा नियमित सराव असल्याचाच त्यांचा समज झाल्याचं सांगितलं. त्यांचे ४७ वर्षीय पती मंजुनाथ राव यांची दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली. हल्ल्यातून वाचलेल्या इतर पर्यटकांप्रमाणेच पल्लवी राव यांनीदेखील दहशतवाद्यांनी फक्त पुरुष पर्यटकांना लक्ष्य केल्याचं सांगितलं.