Kashmir Muslims in Deharadun: पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर त्यावरून देशभर संताप व्यक्त केला जात आहे. २६ पर्यंटकांचा या हल्ल्यात मृ्त्यू जाला. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले. भारतात काही कारणास्तव आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना येत्या ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले गेले आहेत. पण पहलगाम हल्ला प्रकरणामुळे डेहराडूनमध्ये आपलं भविष्य घडवण्यासाठी शिकणाऱ्या काश्मिरी मुस्लीम तरुणांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगामममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. बैसरण खोऱ्यात दाखल झालेल्या पर्यटकांपैकी महिला व मुलांना दहशतवाद्यांनी सोडून दिलं तर पुरुषांना ठार केलं. या सगळ्या प्रकरणावर आता उच्चस्तरीय बैठकांमधून आढावा व पुढील रणनीती ठरवली जात आहे. पण दुसरीकडे काश्मिरी मुस्लीम तरुणांना या प्रकरणामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आपल्याच देशात काश्मिरी तरुणांना जीव मुठीत धरून महाविद्यालयातून पळून जावं लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं घडलं काय?

पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये हिंदू रक्षा दल नावाच्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेनं डेहराडूनमधील काश्मिरी मुस्लिमांना काश्मीरला परत जाण्याचं फर्मान काढलं. शिवाय, परत न गेल्यास कधी कल्पनाही केली नसेल अशा परिणामांना सामोरं जावं लागेल, असा गंभीर इशाराही दिला. या संघटनेचा एक नेता ललित शर्मा याचा यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

यानंतर डेहराडूनमधील मुस्लिमांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले. डेहराडूनच्या बाबा फरीद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये शिकणाऱ्या काही काश्मिरी विद्यार्थ्यांना दमदाटीचे प्रकारही घडले. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून आपल्याला ओळखणारेच आता धमकावत असल्याची खंत या विद्यार्थ्यांनी इंडियन एक्स्प्रेसकडे व्यक्त केली. “जर आम्ही इथे थांबलो तर संकटात सापडू, असा दबाव इथल्या स्थानिकांनी आमच्यावर टाकला”, असं या विद्यार्थ्यानं सांगितलं.

विद्यार्थ्यांनी मध्यरात्री सोडलं कॉलेज!

याातले अनेक विद्यार्थी तातडीने विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. काही काश्मिरी मुस्लीम विद्यार्थी तर मध्यरात्री २ वाजता हॉस्टेल सोडून जॉली ग्रँट एअरपोर्टला रवाना झाले. “आम्ही रात्री विमानाचं तिकीट काढलं. डेहराडूनमध्ये राहण्याची आम्हाला भीती वाटत होती. त्यामुळे आम्ही तिथून लगेच विमानतळाच्या दिशेनं निघालो”, असं एका विद्यार्थ्यानं सांगितलं.

“संध्याकाळी ६ वाजता आमचं दिल्लीपर्यंतं विमान आहे. तिथून पुढे श्रीनगरपर्यंतचं विमान थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता आहे. आमच्या कॉलेजमधले प्राध्यापक म्हणाले की त्यांना आमच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. त्यांनी आम्हाला परिस्थिती सामान्य होईपर्यंत चंदीगडला पाठवण्याचाही विचार केला होता. पण आम्ही मध्यरात्रीच कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला त्यांची कार आणि गार्ड विमानतळापर्यंत जाण्यासाठी दिले”, अशी माहिती एका विद्यार्थ्यानं दिली.

कुटुंबीयांच्या जिवाची घालमेल!

दरम्यान, उघडपणे धमक्या येत असताना आपल्या मुलांना अशा ठिकाणी ठेवणं पालकांसाठी प्रचंड यातनादायी ठरत आहे. “माझ्या आईनं तर मला घरी परतण्यासाठी धोशाच लावला होता. सुरुवातीला तिनं धमक्या देणारे काही व्हिडीओ पाहिले. पण जेव्हा तिला हे समजलं की भारताच्या इतर भागातही विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे, तेव्हा आई म्हणाली की थेट घरी ये. काश्मीरमध्ये माझ्या घराजवळही काही फारशी सुरक्षित स्थिती नाही”, अशा शब्दांत एका विद्यार्थ्यानं त्याची अवस्था कथन केली.