pahalgam terrorist attack Suspect adil ahmed thoker : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आदिल अहमद ठोकर हा २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला होता आणि सहा वर्षांनी तो तीन ते चार दहशतवाद्यांना बरोबर घेऊन परतला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
आदिल अहमद ठोकर हा पहलगामच्या बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते. ठोकर हा जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील गुरे गावाचा स्थानि रहिवासी आहे.
जम्मू-काश्मीरमधील गाव ते पाकिस्तान प्रवास
आदिल अहमद ठोकर हा २०१८ मध्ये स्टुडंट व्हिसावर पाकिस्तानात गेला. गुप्तचर संघटनांच्या माहितीनुसार, ठोकर हा पाकिस्तानात जाण्याच्या आगीपासूनच तो कट्टरतावादाकाडे झुकला असल्याची चिन्हे दिसून आली होती. तसेच भारत सोडण्यापूर्वीच तो सीमेपलीकडील बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांच्या संपर्कात होता, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानात गेल्यानंतर ठोकर हा सार्वजनिक जीवनातून गायब झाला होता. त्याने त्याच्या कुटुंबियांशी देखील संपर्क साधला नाही, तो कुठे आहे याबद्दल आठ महिने कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्याच्या डिजीटल फूटप्रिंटचा मागोवा घेणाऱ्या गुप्तचर यंत्रणांना देखील काही सापडले नाही. तेव्हा त्याच्या बिजबेहरा येथील घरावर पाठत ठेवण्यात आली, मात्र त्यामधूनही कोणतीही माहिती समोर आली नाही.
गुप्तचर सूत्रांनुसार या कालावधीत ठोकर हा विचारधारेशी संबंधित आणि निमलष्करी प्रशिक्षण घेत होता. तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित हँडलर्सच्या प्रभावाखाली होता.
२०२४ च्या अखेरीस आदिल अहमद ठोकर हा पुन्हा गुप्तचर संस्थांच्या नजरेत आला, पण यावेळी तो भारतात आला होता. गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोकरने ऑक्टोबर २०२४ मध्ये पूंछ-रजौरी सेक्टरमधून एलओसी ओलांडली. हा बाग अत्यंत दुर्गम असून येथून बऱ्याचदा अवैधरित्या सीमा ओलांडली जाते.
यावेळी ठोकर बरोबर तीन ते चार व्यक्ती होते ज्यांच्यापैकी एक पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा हा होता. मुसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आणखी एक मुख्य आरोपी आहे. त्याला सुलेमान म्हणून देखील ओळखले जाते. ठोकरने मुसाला भारतीय हद्दीत प्रवेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे मानले जात आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतर ठोकर हा लपून राहिला, कोणाच्या नजरेत येऊ नये यासाठी त्यांनी जंगली आणि डोंगराळ मार्गांचा वापर केला. गुप्त मार्गाने अनंतनागमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याचा किस्तवार येथे काही काळासाठी सुगावा लागला होता, असे सूत्रांनी सांगितले.
दहशतवाद्यांना आसरा
अनंतनाग मध्ये पोहचल्यानंतर ठोकर हा भूमिगत झाला असे मानले जाते. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने ज्या पाकिस्तानी नागरिकांबरोबर घुसखोरी केली होती त्यापैकी किमान एका पाकिस्तानी नागरिकाला, कदाचित जंगलातील छावणीमध्ये किंवा गावातील गुप्त ठिकाणी आश्रय दिला होता.
ठोकर हा अनेक आठवडे लपून राहिला, या काळात त्याने दहशतवादी गटांशी संपर्क स्थापन केला. तसेच या काळात तो सातत्याने मोठ्या हल्ल्यासाठी योग्य ठिकाणी आणि संधी शोधत होता.
याच कालावधीत वार्षिक अमरनाथ यात्रा संपल्यानंतर या भागातील पर्यटन स्थळे हळूहळू पुन्हा उघडण्यात येत होती. सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेल्या बैसरन भागात मार्च २०२५ पासून पुन्हा पर्यटकांच्या गर्दीत होऊ लागली होती. सुरक्षा यंत्रणांच्या मते. ही संधी ठोकर आणि त्यांच्या टीमने साधली.
पहलगाम हल्ला
२२ एप्रिल रोजी दुपार १.५० वाजता ठोकरसह इतर दहशतवादी पाईन जंगलातून बैसरन येथे आले. त्यांच्याकडे असॉल्ट रायफल्स होत्या, ते लपून पर्यटक असलेल्या भागांमध्ये गेले.
सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले की हल्ल्यावेळी किमान पाच दहशतवादी होते. तसेच ते वेगवेगळ्या लहान गटांमध्ये विभागले गेले होते आणि त्यांनी बैसरन येथील तीन वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य केले. हा संपूर्ण हल्ला दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ चालला. घटनास्थळी मदत पोहोचेपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. दरम्यान या हल्ल्यातील मृतांमध्ये २५ पर्यटक आणि एक स्थानिक नागरिकाचा समावेश होता. या हल्ल्यात नौदलाचा आणि गुप्तचर विभागाचा एक असे दोन सुरक्षा कर्मचारीही मृत्युमुखी पडले आहेत.
बैसरन हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन प्रमुख संशयितांपैकी एक म्हणून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ठोकरचे नाव जाहीर केले आहे. इतर दोघांची ओळख पाकिस्तानी नागरिक म्हणून झाली असून त्यांची नावे हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई अशी आहेत.
दरम्यान या तीन आरोपींची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत. तसेच त्यांना पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी अनंतनाग, पहलगाम आणि लगतच्या जंगलांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.